माढा लोकसभा मतदार संघातून पवारांचा युटर्न

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 11-03-2019 | 11:49:36 pm
  • 5 comments

माढा लोकसभा मतदार संघातून पवारांचा युटर्न

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदार संघातून माघार घेतली आहे. त्याऐवजी त्यांचे नातू आणि अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा पवार पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार यांच्याकडे माढा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती. पवार यांनी मतदारसंघात दौरे करून विविध कार्यक्रमांना हजेरीही लावली होती.

दरम्यान, शरद पवार यांनी पुण्यात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पार्थ यांनी निवडणूका लढवाव्यात, अशी इच्छा कार्यकर्त्यांची असल्याचे सांगितले. नव्या पीढीला संधी द्यायला हवी, असे म्हणत त्यांनी पार्थ यांचे नाव पुढे केले आहे. तुम्हाला पराभवाची भीती वाटते का, असा प्रश्न विचारल्यावर चौदावेळा निवडणून आल्यावर पराभवाची भीती कसली, असे प्रत्युत्तर त्यांनी यावेळी दिले.

लोकसभा निवडणुकीसाठीच्या राष्ट्रवादीच्या जागांवरील इच्छुकांची काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये बैठक झाली होती. बैठकीत झालेल्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माढा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह करण्यात आला. शरद पवार यांनी यानंतर मतदारसंघाची चाचपणी करण्यासही सुरुवात केली होती. भाजप नेते आणि राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पवारांसाठी बारामती हाच लोकसभा मतदार संघ सुरक्षित असून त्यांनी माढा मतदार संघातून निवडणूक लढवल्यास तुम्हाला हरवू, असा टोला लगावला होता.

Best Reader's Review