Breaking News

राज ठाकरे – अहमद पटेल यांच्यात बैठक

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 01-02-2019 | 11:29:02 pm
  • 5 comments

राज ठाकरे – अहमद पटेल यांच्यात बैठक 

 

महाआघाडीत सामील होणार असल्याची चर्चा रंगली 

मुंबई  – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांच्या विवाहसोहळ्यात अहमद पटेल यांची उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. लग्नानिमित्त आलेल्या अहमद पटेल आणि राज ठाकरे यांच्यात 20 मिनिटे खासगीत बैठक झाल्याचे वृत्त आहे. या बैठकीनंतर राज ठाकरे देखील महाआघाडीत सामील होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

अमित ठाकरे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. या विवाहसोहळ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. या विवाहसोहळ्यासाठी राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना देखील निमंत्रण दिले होते. या विवाहसोहळ्यात कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींच्या वतीने अहमद पटेल हे सहभागी झाले होते. अहमद पटेल हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार राज ठाकरे यांनी अहमद पटेल यांची खासगीत भेट घेतली. सुमारे 20 मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, सद्यपरिस्थिती पाहता मनसेचा महाआघाडीत समावेश करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेला दोन ते तीन जागा देण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी आहे. मात्र, कॉंग्रेसच्या सहमतीशिवाय राष्ट्रवादीला हा निर्णय घेता येणार नाही, असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. पटेल यांच्या उपस्थितीमुळे राज ठाकरे आणि गांधी कुटुंबात चर्चेसाठी एक दार उघडले आहे, याकडेही विश्‍लेषकांनी लक्ष वेधले.

Best Reader's Review