Breaking News

गडकरींच्या गावातील पराभव ही आगामी निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची नांदी – अशोक चव्हाण

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 30-09-2018 | 11:58:54 pm
  • 5 comments

गडकरींच्या गावातील पराभव ही निवडणुकीतील

भाजपच्या पराभवाची नांदी – अशोक चव्हाण

मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) ग्रामपंचायतीमध्ये भाजपचा दारूण पराभव करत कॉंग्रेसने एकहाती विजय मिळविला आहे. भाजपचा हा पराभव आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील भाजपाच्या पराभवाची नांदी असून देशातील व राज्यातील जनता पुन्हा कॉंग्रेसला निवडून देईल असा विश्वास व्यक्त करून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील यशाबद्दल कॉंग्रेस नेते व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

चव्हाण म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारने मोठ-मोठ्या घोषणा व खोटी आश्वासने देण्यापलिकडे काहीही केले नाही. महागाई रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनाचे दर कमी करण्याऐवजी इंधनावर अन्याय्य कर व अधिभार लावून सरकार सर्वसामान्यांची लूट करित आहे. सरकारच्या संरक्षणात उद्योगपती बॅंकांचे हजारो कोटी रूपये घेऊन परदेशात पळून जात आहेत. शेतक-यांच्या मालाला हमीभाव नाही. तरूणांच्या हाताला रोजगारी नाही.

महिला सुरक्षित नाहीत. केंद्र आणि राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. जनतेचा भाजप सरकारवर विश्वास राहिला नाही त्यामुळेच नितीन गडकरी यांचे जन्मगाव धापेवाडा आणि गडकरींनी दत्तक घेतलेल्या व पहिली डीजीटल ग्रामपंचायत म्हणून प्रसिद्ध पाचगावातील जनतेने भाजपचा पराभव केला आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या वाराणसीतील गावात व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातही भाजपचा पराभव करून जनतेने कॉंग्रेसच्या हाती सत्ता दिली आहे.

गेल्या साडेचार वर्षात देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत जनतेने भाजपचा पराभव केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या फुलपूर लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला आहे.

महाराष्ट्रातल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातही भाजपचा पराभव झाला. भाजपचा भ्रष्ट आणि धर्मांध चेहरा देशातील जनतेसमोर आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांत भाजपचा पराभव करून जनता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सरकार आणेल असा विश्वास कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.

Best Reader's Review