Breaking News

नैसर्गिक, पारंपारिक आणि प्रदुषणमुक्त पद्धतीने सण साजरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 23-09-2018 | 11:29:30 pm
  • 5 comments

गणपती बाप्पाला डीजे-डॉल्बीची गरज नाही: मुख्यमंत्री

मुंबई :गणपती बाप्पाला डीजे आणि डॉल्बीची आवश्यकता नाही, असे परखड मत मांडत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीजे-डॉल्बी बंदीचे समर्थन केले आहे.

ध्वनीप्रदूषणाच्या मुद्द्यावरून मुंबई हायकोर्टाने डॉल्बीला परवानगी देण्यास नकार दिला आहे. या आदेशाला स्थगिती मिळावी म्हणून कोर्टात विनंती करण्यात आली होती ती विनंतीही फेटाळण्यात आली आहे. हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना पुणे, कोल्हापूर या शहरांतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या बंदीला उघड आव्हान देण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ठाम भूमिका घेत डीजे-डॉल्बीला विरोध दर्शविला आहे.

दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी कृत्रिम पद्धतीने तयार करण्यात आलेल्या  पाण्याच्या टाकीमध्ये  श्री  गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केले. नैसर्गिक, पारंपरिक पद्धतीने आणि प्रदुषणमुक्त सण साजरे करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 

 

श्री.फडणवीस म्हणाले, गणेशोत्सवात सामाजिक अभिसरण होत असते. या उत्सवात समाजातील भेदभाव  टाळून संघटीत शक्ती आपण ईश्वरास अर्पित करीत असतो. उत्सवांची रचना ही निसर्गाशी साधर्म्य साधणारी असल्याने उत्सवात निसर्गाचे संवर्धन करणे महत्वाचे आहे. पारंपारिक वाद्यांमध्ये अनोखा उत्साह असल्याने प्रदूषण टाळण्यासाठी पारंपारिक वाद्यांचा वापर करावयास हवा, असेही श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

 

Best Reader's Review