Breaking News

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शुभारंभ हेल्थ कार्डचे वाटप; ३.५ लाख कुटुंबाना फायदा

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 23-09-2018 | 11:06:07 pm
  • 5 comments

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा

केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शुभारंभ

 
हेल्थ कार्डचे वाटप; ३.५ लाख कुटुंबाना फायदा
ठाणे, दि. 23 : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्मान भारत या योजनेचा शुभारंभ आज ठाणे येथे  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १० कुटुंबांना हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, खासदार राजन विचारे, आमदार किसन कथोरे, आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, आरोग्य उपसंचालक डॉ गौरी राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.रेंगे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती.
 
यावेळी अलका धोंगडे, शंकर घोडे, जयेश गोडे, सुमन इतरकर, रुपाली धोंगडे, मानसी भगत, चंद्रकांत साबळे, लक्ष्मीशंकर घोडे, सखुबाई यांना मान्यवरांच्या हस्ते हेल्थ कार्ड देण्यात आले.
 
 
 
याप्रसंगी बोलतांना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधांसाठी संरक्षण असते, आरोग्य विमा प्रीमियम हप्ते भरणाऱ्या लोकांनाही ते मिळते पण गरीब, आणि दुर्बल घटकाला वैद्यकीय मदतीची गरज भासली तर पैशाअभावी त्यांना उपचार मिळू शकत नाहीत पण  आयुष्मान भारत योजनेमुळे संपूर्ण देश निरोगी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. देशभरातील सरकारी रुग्णालये या योजनेत सहभागी आहेत तशीच लवकरच बहुसंख्य खासगी रुग्णालये देखील यात समाविष्ट करण्यात येतील.
 
 
या योजनेत ११ कोटी कुटुंबाना मिळणारे हेल्थ कार्ड म्हणजे आरोग्याचा परवानाच असणार आहे असेही ते म्हणाले. आमदार किसन कथोरे व खासदार कपिल पाटील यांनी देखील या योजनेमुळे वैद्यकीय लाभ मोठ्या प्रमाणावर गरिबांना मिळून या क्षेत्रात क्रांती येईल असे सांगितले.  
 
जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर म्हणाले की कोणत्याही शहराचा हैपी इंडेक्स हा केवळ शहरातील इमारती, सुविधा यावर मोजता येत नाही तर तेथील नागरिकांचे आरोग्य कसे आहे यावरही अवलंबून आहे. या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल असेही ते म्हणाले.  
 
३.५ लाख कुटुंबाना फायदा
 
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ८३ हजार ८९३ तर शहरी भागातील २ लाख ६५ हजार कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालय व भिवंडी येथील इंदिरा गांधी,  कळवा येथील छत्रपती शिवाजी  महाराज तसेच उल्हासनगर येथील रुग्णालये संलग्नित करण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत 1 हजार 122 आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे अशी माहिती यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी यावेळी दिली. राज्य आरोग्य हमी सोसायटी, जीवनदायी भवन, वरळी येथून या योजनेचे नियंत्रण केले जाणार आहे.
याप्रसंगी आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
   
कोण पात्र आहेत
 
आयुष्मान भारत योजनेत पात्र लाभार्थी ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीचे दारिद्र रेषेखालील कुटुंब, भूमिहीन कुटुंब, दिव्यांग सदस्य असलेले कुटुंब, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एकाखोलीचे कच्चे घर असलेले कुटुंब, महिला कुटुंब प्रमुख असलेले, यांचा या  योजनेत सहभाग आहे. तर शहरी भागातील कचरा वेचणारे कुटुंब, भिकारी, घरकाम करणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम, प्लंबर, गवंडी,वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, झाडू मारणारे/सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकल रिक्षा ओढणारे, दुकानात काम करणारे शिपाई, अटेंडट, हॉटेल वेटर, मेकॅनिक/वीजतंत्री, असेम्ब्ली , दुरुस्ती करणारे, धोबी आणि चौकीदार या वर्गीकरणातील कुटुंब या योजनेत पात्र आहेत.
 
या कुटुंबाना प्रतिवर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी 5 लाख रुपये  विमा संरक्षण राहणार आहे. या योजनेंतर्गत त्या कुटुंबाना ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील. यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई-कार्ड देण्यात येणार आहेत.
यासाठी जी रुग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रुग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील.
 

तूर्त राज्यात सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन-आरोग्य योजना ही कार्यान्वित आहे. आयुष्यमान भारत योजनेसोबतच ही योजना चालू राहणार आहे. आयुष्यमान भारत योजनेत किरकोळ व मोठे आजार यांच्या उपचारांचा समावेश आहे. हे या योजनेचे वैशिष्ट्य होय.
 

Best Reader's Review