Breaking News

जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मिळणार आयुष्मान भारत योजनेचा लाभ - दिलीप कांबळे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 23-09-2018 | 09:04:46 pm
  • 5 comments

जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मिळणार

आयुष्मान भारत योजनेचा लाभ - दिलीप कांबळे

हिंगोली : केंद्र शासनाची महत्वाकांक्षी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून या आरोग्य योजनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 28 कुटुंबाना मोफत उपचाराचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’च्या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार डॉ. संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अनिल पतंगे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री.कांबळे म्हणाले की, आज शुभारंभ झालेल्या आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेसोबतच राज्य शासनाची ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ ही एकत्रितपणे राबविण्यात येणार आहे. आयुष्मान जन आरोग्य योजनेचा लाभ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळणार असून, यात धर्म, जात, पंथ असा भेदभाव असणार नाही. या योजनेअंतर्गत 1300 हून अधिक गंभीर आजारांवर लाभार्थ्यांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहे. हे उपचार देशातील कोणत्याही शासकीय किंवा मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये करता येणार आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात खासगी रुग्णालयांना देखील सहभागी करुन घेतले जाणार असून हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या महत्वकांक्षी योजनेमुळे देशातील नगारिकांना आरोग्य सुरक्षा प्राप्त झाली असून, नागरिकांनी या योजने अंतर्गत आपल्या आरोग्याची तपासणी करुन घेत गंभीर आजारापासून सावध राहावे.

तसेच या योजनेचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा यासाठी आशाताई सेविकांची जबाबदारी वाढली आहे. तसेच लोकप्रतिनीधीनी देखील या योजेनेचा व्यापक प्रचार प्रसिध्दी करुन नागरिकांना या महत्वाच्या योजनेची माहिती करुन द्यावी असे ही पालकमंत्री कांबळे यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, आज आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांतीकारी योजनेची सुरुवात झाली आहे. सन 2011 मध्ये करण्यात आलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेतील आकडेवारीनुसार कुटुंबांची निवड आयुष्मान जन आरोग्य योजनेतंर्गत करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेवून नागरिकांनी आपल्या जीवन आणि आरोग्य सुरक्षीत करावे. तसेच या योजनेबाबत अधिक माहितीकरीता 14555 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आयुष्यमान भारत जन आरोग्य योजने अंतर्गत कोणत्याही कुटुंबाना देशात कोठेही लाभ घेता येणार आहे. सर्वांना सांकेतीक क्रमांक देण्यात येणार आहे सदर क्रमांक सांगितल्या नंतर त्याला आवश्यक ते उपचार मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेतंर्गत वर्षातून एक वेळेस पाच लाख रुपयांपर्यंतचा लाभ वैद्यकीय उपचाराकरीता मिळणार आहे. याकरीता आता लाभार्थ्यांना शिधापत्रिका किंवा कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता लागणार नाही. आतापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील 117 लाभार्थ्यांची आयुष्यमान भारत जन आरोगय योजने अंतर्गत नोंद झाली आहे. तसेच या योजने अंतर्गत राज्यातील पहिले ई-कार्ड हे हिंगोली जिल्ह्यात तयार झाल्याची माहिती प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.

यावेळी आयुष्यमान भारत योजने सोबतच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एकत्रितरित्या राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा यावेळी निवडक लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ‘ई-कार्ड’चे वाटप करण्यात आले.

Best Reader's Review