Breaking News

पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 23-09-2018 | 07:47:11 pm
  • 5 comments

पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा

 

अशोक चव्हाण : राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी


27 सप्टेंबरला मुंबईत कॉंग्रेसचा मोर्चा

मुंबई – राफेल विमान खरेदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे. संसदेत आणि संसदेबाहेर राफेल खरेदी सौद्याप्रकरणी वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेची आणि देशातल्या 130 कोटी जनतेची फसवणूक आणि विश्वासघात केला आहे. या प्रकरणातून मोदींचा भ्रष्ट चेहरा समोर आला असून “चौकीदार ही भागीदार है’ हे सिध्द झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान व संरक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तसेच संयुक्त संसदीय समितीमार्फत या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे आयोजीत पत्रकारपरिषदेत खासदार अशोक चव्हाण म्हणाले, मोदींना देशहितापेक्षा त्यांच्या उद्योगपती मित्रांचा फायदा महत्त्वाचा आहे. मोदी त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या फायद्यासाठीच देश चालवत आहेत. हे पुन्हा एकदा राफेल घोटाळ्यावरून सिध्द झाले आहे.

देशाच्या सैनिकांची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेला बाजूला ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींच्या फायद्यासाठीच राफेल डील बदलली, हे यावरून स्पष्ट झाले आहे. देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणा-या सैनिकांचा त्यांनी अवमान केला आहे. राष्ट्रीय सुरक्षेला ढाल बनवून मोदी राफेल घोटाळा लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दुर्देवी आहे, असा संतापही चव्हाण यांनी व्यक्त केला.

कॉंग्रेस सरकारने एका राफेल विमानाची किंमत 526.10 कोटी निश्‍चित केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अनिल अंबानींना सोबत घेऊन फ्रान्सला गेले. जुनी डील रद्द करून प्रति राफेल विमान 1670.7 कोटी किंमत ठरवून राफेल खरेदीचा करार केला. या नव्या डीलमध्ये 41 हजार 205 कोटी रूपये जास्त मोजले. या बदल्यात अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स या 10-12 दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या कंपनीला 30 हजार कोटींचे ऑफसेट कंत्राट व 1 लाख कोटींचे लाईफ सायकल कंत्राट दिले गेले. राफेल खरेदी व्यवहारात देशातील जनतेचे 1 लाख 30 हजार कोटी रूपये मोदींनी अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीला दिले असून हा एकप्रकारे घोटाळा आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.

योगींनी माफी मागावी…
छत्रपती शिवाजी महाराज हे जगविख्यात राजे आहेत. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करून महाराजांचा अवमान केला आहे. त्याच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करून योगी आदित्यनाथ यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

सैनिकांच्या शौर्याचा स्वार्थासाठी वापर
शाळा कॉलेजांमधून “सर्जीकल स्ट्राईक डे’ साजरा करण्याचे फर्मान मोदी सरकारने काढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने सैनिकांच्या शौर्याचा स्वार्थासाठी व राजकीय फायद्यासाठी वापर सुरु केला आहे, हे अत्यंत दुर्देवी आहे. आपल्या एका सैनिकाचे शीर पाकिस्तानी सैनिकांनी धडापासून वेगळे केले.

काश्‍मीरमध्ये रोज सैनिक मारले जात आहेत. मग “एक बदले 10 सिर लायेंगे’ म्हणणारे 56 इंच छातीवाले पंतप्रधान गप्प का आहेत? असा सवाल करीत या सरकारकडे काश्‍मीरबाबत कुठलेही ठोस धोरण नाही. भाजप सरकार सैनिकांच्या बलिदानाचे राजकारण करत आहे, असा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला.

Best Reader's Review