Breaking News

उत्तम मार्गदर्शकाला मुकलो - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 17-08-2018 | 12:16:45 am
  • 5 comments

उत्तम मार्गदर्शकाला मुकलो - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

 
देशाचे माजी प्रधानमंत्री, संवेदनशील कवी, उत्तम वक्ते, पत्रकार, आमचे मार्गदर्शक, भारतरत्न आदरणीय श्री. अटलबिहारी वाजपेयी  यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायक आहे. त्यांच्या जाण्याने आम्ही सर्वजण एका उत्तम मार्गदर्शकाला मुकलो आहोत. त्यांची उणीव कधीही भरुन निघणार नाही. त्यांचे कार्य सर्व भारतीयांसाठी सदैव प्रेरणादायी आहे अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
 
सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी,
पार्टियां बनेंगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए,
इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए.. या श्री. वाजपेयी यांच्या शब्दांतून लोकशाहीवरील त्यांची नितांत श्रद्धा दिसून येते. श्री वाजपेयी जी हे आपल्या विचारांप्रमाणें जगणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या कृतीतून प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी प्रेरणा दिली आहे. एक उत्तम वक्ता, संवेदनशील राजकारणी म्हणून आमचे ते आदर्श आहेत. त्यांच्या जाण्याने माझ्यासारख्या त्यांच्या कार्यकर्त्यांची तसेच देशाची वैयक्तिक हानी झाली आहे. त्यांच्या विचारातून, लिखाणातून ते आम्हाला नेहमीच प्रेरणा देतील.
०००००
देशातील असंख्‍य कार्यकर्त्‍यांचे, नागरिकांचे पितृछत्र हरपले – सुधीर मुनगंटीवार
भारतरत्‍न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या निधनाने देशातील असंख्‍य कार्यकर्त्‍यांचे, नागरिकांचे पितृछत्र हरपल्‍याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. आज एक युगपुरूष काळाच्‍या पडद्याआड गेला असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.
 
 
 
 
 
1989 च्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या प्रचारादरम्‍यान ते चंद्रपूरला सभेसाठी आले होते. त्‍यावेळी मी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार होतो. अटलजींनी  त्‍यावेळी आपल्‍या भाषणात म्‍हटले होते की, ‘ये नौजवान आगे चलकर बडा नेता बनेगा’. अटलजींचे ते आशीर्वचन माझ्यासाठी आयुष्‍यभराचा ठेवा आहे. माझ्या सामाजिक आणि राजकीय प्रवासात त्‍यांचे हे कौतुकोद्गार माझ्यासाठी कायम प्रेरणादायी ठरले.
 
 
 
 
 
एक अजातशत्रू नेता, कर्मठ पत्रकार, संवेदनशील कवी, अमोघ वक्‍तृत्‍वाची देणगी लाभलेला लोकनायक, भारताला जागतिक पातळीवर आघाडीवर नेणारा जाणता प्रधानमंत्री असे बहुआयामी व्यक्‍तिमत्‍व असलेल्‍या अटलजींच्‍या जाण्‍याने एका ध्‍यासपर्वाची अखेर झाली आहे, तत्वनिष्ठा कशी असावी याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अटलजी. भारतीय राजकारणात, समाजकारणात दीर्घकाळ आपल्या अतुलनीय कर्तृत्वाचा ठसा त्यांनी उमटविला पण तत्वांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. अटलजींच्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत, असेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्‍या शोकसंदेशात म्‍हटले आहे.
 
००००००
 
 
 
राजकारणातील तपस्वी व्यक्तिमत्व गमावले - शिक्षणमंत्री विनोद तावडे 
आपल्या सर्वसमावेशक नेतृत्वाने देशाची प्रगती साधणारे माजी प्रधानमंत्री, एक मुत्सद्दी राजकारणी, आपल्या वाणीने करोडोंना मंत्रमुग्ध करणारे अमोघ वक्ते आणि स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर भारतीय राजकारणावर स्वत:चा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजे अटल बिहारी वाजपेयी. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशाने राजकारणातील एक तपस्वी व्यक्तिमत्व गमाविले असल्याची प्रतिक्रिया शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली आहे.
 
 
 
 
 
प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय जनसंघ आणि पुढे भाजपला दिशा देणारे सर्वसमावेशक नेतृत्व अशीच अटल बिहारी वाजपेयी यांची ओळख कायम राहील. नैतिक मूल्यांवर अढळ श्रद्धा असणारे राजकारणी, प्रखर देशभक्त अशी ओळख असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीयच नव्हे तर जागतिक राजकारणावर आपल्या कर्तृत्वाने अमीट ठसा उमटवला. काव्यशास्त्रविनोदात रमणारे कवी मनाचे राजकारणी अशीही त्यांची एक ओळख कधीही न विसरता येणारी आहे. भविष्याचा वेध घेणारे त्यांचे सर्वसमावेशक विचार, मार्गदर्शन, नेतृत्व हे देशातील कोट्यवधी लोकांना कायम प्रेरणादायी, आश्वासक आणि समाजाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वासही श्री. तावडे यांनी शोकसंदेशात व्यक्त केला.
०००००

 
अटलजी एक विचार होता : चंद्रशेखर बावनकुळे
 
देशाचे माजी पंतप्रधान, भाजपचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते, कुशल वक्ते व थोर चिंतक अटल बिहारी वाजपेयी हे व्यक्ती नव्हे तर एक विचार होता. त्यांचे निधन म्हणजे एक युगाचा अंत होय, अशी भावना राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या अटलजींचे राजकारण उदारमतवादी व समानतेचे होते. राजकारणात राहूनही अजातशत्रू असलेल्या अटलजींनी देशालाच नव्हे तर विश्वाच्या राजकारणाला दिशा दिली. अनेक दशकांपर्यंत देशाची सेवा करून संपूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित केले, अशा भावनाही श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केल्या.
 
भाजपचे मार्गदर्शक असलेल्या अटलजींनी पक्षात लाखो कार्यकर्ते घडविले आणि पक्षाशी जोडले. पक्षाची एक नैतिक शक्ती ते होते. देशासाठी प्रसंगी कठोर निर्णय घेण्यास ते कधीही मागे हटले नाहीत. अणुचाचणी करून त्यांनी संपूर्ण विश्वाला भारताची ताकद दाखवून दिली. त्यांचे निधन म्हणजे एका युगाचा अंत झाला असून भारतीय राजकारणाचे न भरून निघणारे नुकसान झाल्याचे श्री. बावनकुळे म्हणाले.

Best Reader's Review