Breaking News

खासदार उदयनराजेंचा मास्टर स्ट्रोक

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 06-08-2018 | 12:32:37 am
  • 5 comments

अल्टीमेटमनंतर आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष

खासदार उदयनराजेंचा मास्टर स्ट्रोक

सातारा-मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर अखेर खा.उदयनराजेंनी आपली भूमिका रविवारी स्पष्ट करत सरकारला अखेरचा अल्टीमेटम देवून टाकला. आजपर्यंत लाखोंच्या संख्येने 58 मोर्चे व राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी इशारे देवून देखील आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने संथ गतीने पाऊले पडत होती. मात्र, आता छ.शिवाजी महाराजांच्या थेट तेराव्या वंशज या नात्याने खा.उदयनराजेंनी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. परिणामी छ.शिवाजी महाराजांचे नाव घेवून सत्तेत आलेले भाजप-सेना सरकार काय व कशा पध्दतीने भूमिका घेते यावर राज्यातील आगामी राजकारणाची दिशा ठरू शकणार आहे.
छ.शिवाजी महाराजांचे वंशज आणि डॅशिंग पर्सानालिटी अन बेधडक विधाने यामुळे खा.उदयनराजेंचा राज्यात फॅन फॉलोअर्सची संख्या वाढत आहे. या अगोदर स्वपक्षातील नेत्यांवरच टिकास्त्र करणारे खा.उदयनराजेंचे विशेषत: मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने राज्यात समर्थकांची संख्या वाढताना दिसून आली. सोशल मिडीयावर खा.उदयनराजेंच्या कोणत्याही व्हिडीओला लाखो व्हूज मिळत असल्याचे यु ट्युबवर दिसून येते. मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चात खा.उदयनराजे सहभागी झाले नव्हते. त्या मागील कारणे त्यांनाच माहित असावीत. मात्र, त्यानंतर बराच कालावधी लोटला मात्र मराठा आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने हालचाल होत नव्हती. राज्यसरकारने स्थापन केलेल्या आयोगाच्या कामाचा पाठपुरावा ज्या पध्दतीने घ्यायला हवा होता तो घेतला गेला नाही. अखेर मराठा समाजाच्या संयमाचा बांध फुटू लागला व मागील काही दिवसांपुर्वी बीड जिल्ह्यातील परळी येथे सुरू झालेल्या आंदोलनाच्या निमित्ताने आरक्षणाचा वणवा राज्यभरात पेटू लागला. त्यानंतर साताऱ्यासह राज्यात ठीकठीकाणी आंदोलने झाली. साताऱ्यासह चाकणमध्ये आंदोलनाला हिसंक वळण लागले. तर चार युवकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. साहजिकच त्यामुळे सरकारवर अन सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर मराठा समाजाचा दबाव वाढू लागला. मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत ही मागे जोराने पुढे येवू लागल्याने खऱ्या अर्थाने हा दबाव वाढला. त्यात लोकसभेची निवडणूक सात महिन्यांवर तर विधानसभेची निवडणूक वर्षभरावर येवून ठेपल्याने लोकप्रतिनिधींना घाम फुटु लागला.
सध्या सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कॉंग्रेस -राष्ट्रवादी आमच्या सरकारने आरक्षण दिले होते असे सांगून युती सरकारवर टीका करित आहे. तर विद्यमान युती सरकार आयोगाचा अहवाल येण्याची वाट पहात आहे. एकूणच सत्ताधारी व विरोधक दोघांच्या राजकारणात आरक्षणाचा विषय बाजूला राहू नये यासाठी विशेषत: मराठा समाजातील अभ्यासक व क्रांती मोर्चाचे समन्वयक सतर्क राहिले. तर दुसऱ्याबाजूला खा.उदयनराजे यांनी चार दिवसांपुर्वी पत्रकार परिषद व रविवारी कृतीशील भूमिका घेत मराठा आरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन तर केलेच मात्र अखेरीस त्यानंतर त्यांनी सरकारला दिलेला जो अल्टीमेटम आहे त्याकडे एक मास्ट्रर स्ट्रोक म्हणून पहावे लागेल. खा.उदयनराजेंनी आरक्षणाचा विषय मार्गी लावण्यासाठी लोकशाहीच्या तिन्ही स्तंभाना समन्वयाने निर्णय घेण्याचे आवाहन करत अखेर आरक्षण द्यायचे नसले तर सरळ नाही म्हणून सांगा असे सरकारला खडसावले आहे. विद्यमान सरकारला खडसावताना त्यांनी आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी काय केले तसेच घटना दुरूस्ती करण्याच्या मागणीवर पक्षश्रेष्ठींनी घरचा आहेर नव्हे तर चपराक दिली. आजपर्यंत खा.उदयनराजे मिडीयासमोर एकदा आल्यानंतर पुन्हा कधी येतील हे कोणीच सांगू शकत नव्हते. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर त्यांनी चार दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेतली व त्यानंतर तातडीने आरक्षण परिषदेचे आयोजन अन त्यानंतर सरकारला दिलेला अल्टीमेटम हा राज्याच्या राजकारणाची दिशा बदलवू शकणारा ठरू शकतो. राज्यात लोकसंख्येच्या तुलनेत मराठा समाजाची संख्या सर्वाधिक आहे. लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेनुसार या संख्येकडे सर्वाधिक मतदार देखील म्हणून पाहता येईल. देशाची आणि महाराष्ट्राच्या मतदारांच्या वयोगटाची टक्केवारी पाहिली तर त्यामध्ये सर्वाधिक मतदार तरूण आहेत. मराठा समजातील बहुसंख्य तरूण मतदार आहे.खा.उदयनराजेंकडे वंशज या नात्याने तसेच त्यांच्या दिलखुलास स्वभावाने समर्थकांची संख्या वाढत असल्याने खा.उदयनराजेंचे भूमिका आगामी निवडणूकांमध्ये निर्णायक ठरू शकणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सरकार मराठा आरक्षणाचा निर्णय किती दिवसात घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

कॉलर, चुटकी अद्याप नाही
खा.उदयनराजेंची पत्रकार परिषद म्हटले की त्यांची हटके स्टाईल सुपरिचित आहे. मात्र, त्यांनी पुण्यात घेतलेल्या सलग दोन परिषदांमध्ये गांभिर्याने भूमिका मांडत सरकारला अल्टीमेटम दिला. त्यावेळी त्यांनी कोठे ही चुटकी वाजवली नाही तसेच कॉलर देखील उडवली नाही. एकूणच दोन्ही पत्रकार परिषदांमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील गांभिर्य व भाष्य आणि इशारे पाहता सरकार आरक्षणाच्या दृष्टीने कामाची गती वाढविणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Best Reader's Review