Breaking News

आता 48 तासांत मिळणार वीजबिल

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 06-08-2018 | 12:26:25 am
  • 5 comments

आता 48 तासांत मिळणार वीजबिल

मुंबई – राज्यातील अडीच कोटींहून अधिक वीज ग्राहकांना वेळेत अचूक वीजबिल मिळावे म्हणून महावितरण कंपनीने विजबिलाच्या छपाई आणि त्याच्या वितरणासाठी केंद्रीय स्तरावरील प्रक्रिया शनिवारपासून सुरू केली. यामुळे शहरी भागातील ग्राहकांना 48 तासांत, तर ग्रामीण ग्राहकांना 72 तासांत वीजबिल मिळेल. याशिवाय जास्तीत जास्त ग्राहकांना वेळेत वीजबिल भरून “प्रॉंम्ट पेमेंट’ सवलतीचा लाभ घेता येईल.

महावितरण वीज कंपनीच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रीयेमुळे वीजबिलाची छपाई आणि ते ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी साधारणत: सात ते आठ दिवसांचा कालावधी लागत होता. ग्राहकांना वेळेत वीजबिल न मिळाल्यामुळे त्यांना सवलत मिळण्यास अडचण येत होती. तसेच वेगवेगळ्या एजन्सीकडून वीजबिलांची छपाई आणि वितरण होत असल्याने या प्रक्रीया संनियंत्रण ठेवणे कठीण जात होते.

यापार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने प्रक्रीया पध्दतीने वीजबिलाची छपाई आणि वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मोबाईल मीटर रिडिंग अँपमुळे प्रत्यक्षवेळी मीटररिडिंग तसेच चेकरिडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे नव्या व्यवस्थेत बिलावरची प्रक्रीया जलदगतीने होऊन ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी अधिक कालावधी मिळेल. याशिवाय वीजबिल भरणा केंद्रातील रांगा कमी होतील, असा विश्वास महावितरणला आहे.

मुदतीत बिल न देणा-या एजन्सींना दंड
नव्या प्रक्रीयेत महावितरणच्या मुख्यालयातील सर्व्हरवर बील तयार करण्यात येणार असून ते परिमंडळ स्तरावर वीजबिल वितरणासाठी नियुक्त करण्यात येणा-या एजन्सीकडे 24 तासांत पाठवले जाईल. त्यानंतर एजन्सीकडून हे वीजबिल शहरात 48 तासांत, तर ग्रामीण भागात 72 तासांत वितरीत करण्यात येईल.दिलेल्या मुदतीत ग्राहकांना वीजबिल न देणा-या एजन्सींना दंड आकारण्यात येणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Best Reader's Review