Breaking News

परभणीत लवकरच मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह - बबनराव लोणीकर

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 04-08-2018 | 11:43:27 pm
  • 5 comments

परभणीत लवकरच मराठा

विद्यार्थ्यांचे वसतिगृह - लोणीकर

परभणी : मराठा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ परिसरामध्ये एकूण 200 मुले व दीडशे मुलींसाठी महिनाभरात वसतिगृहाची सुविधा देण्यात येईल, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज केले.

शासनाने डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता विस्तारित योजना सुरू करण्यास मान्यता दिली होती त्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री.लोणीकर यांनी आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भेट दिली यावेळी त्यांनी कुलगुरू डॉ.अशोक ढवण, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांचेसह विद्यापीठामधील इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली.

श्री.लोणीकर म्हणाले विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा न होता काही इमारती तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करून तात्काळ मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विद्यापीठ परिसरातील वसंत वसतिगृहावर दोनशे मुले तसेच वसुंधरा वसतिगृहामध्ये पन्नास मुली आणि शेतकरी निवास इमारतीच्या जागी शंभर मुलींच्या वसतीगृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतींच्या सुविधा व सुसज्जतेसाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. महिनाभरात वसतिगृह सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अपर जिल्हाधिकारी डॉ.अण्णासाहेब शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.इंगोले, प्राचार्य डॉ.गोखले, कुलसचिव डॉ.लोंढे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे उपस्थित होते.

Best Reader's Review