Breaking News

मराठा आरक्षणासाठी तरुणाने गोदावरीत उडी घेतली

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 24-07-2018 | 01:42:44 am
  • 5 comments

मराठा आरक्षणासाठी तरुणाने

गोदावरीत उडी घेतली

गंगापूर

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाला गंगापुरात हिंसक वळण लागले. या मागणीसाठी काकासाहेब शिंदे यांनी पुलावरून थेट गोदावरी पात्रात उडी घेतली. पात्रात जीवरक्षक नसल्यामुळे अवघ्या काही मिनिटात त्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले असून अनेक ठिकाणी वाहनांची तोडफोड, दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी नगररोडवर रास्ता रोको सुरू केल्याने दोन्ही बाजूला कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप करत आंदोलकांनी मृतदेह गंगापूरच्या पोलीस ठाण्यात आणला असून मुख्यमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणाव वाढला आहे. शिवसैनिक असलेले काकासाहेब शिंदे हे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सुरुवातीपासून आघाडीवर होते.

आरक्षणाच्या मागणीसाठी परळी येथे सात दिवसांपूर्वी मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात आला. आरक्षणासंदर्भात सरकार लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत आंदोलन विसर्जित करणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन आंदोलक तहसील कार्यालयासमोर ठाण मांडून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा नोकरभरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के पदे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला. परंतु आंदोलकांनी तो फेटाळून लावला. परळीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. गंगापूर येथेही आज आरक्षणाच्या मागणीसाठी गोदापात्रात जलसमाधी घेण्याचा इशारा सकल मराठा कृती समितीने प्रशासनाला दिला होता.

पोलिसांची बेपर्वाई, प्रशासन बेफिकिर
मराठा आंदोलकांनी जलसमाधी घेणार असल्याचे निवेदन दिल्यानंतर कायगाव टोका पुलावर वाढीव पोलीस बंदोबस्त, अग्निशामक दलाचे पथक तसेच गोदापात्रात जीवरक्षक तैनात ठेवणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात पुलावर बंदोबस्तासाठी बोटावर मोजण्याएवढे पोलीस होते. सकाळी १० वाजता मराठा कार्यकत्र्यांनी कायगावच्या पुलावर आंदोलन सुरू केले. कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून बसल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. दुपारी तीन वाजता अचानक कार्यकर्त्यांचा एक जत्था कठड्याकडे निघाला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करताच काकासाहेब दत्तात्रय शिंदे (२५) यांनी पुलावरून उडी मारली.

औरंगाबादेत गोदावरीत उडी मारलेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू

दोन मिनिटात खेळ संपला
नाशिक परिसरातील धरणे तुडुंब भरल्यामुळे सध्या वरच्या धरणांमधून गोदावरीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. काकासाहेब शिंदे यांनी जिथे उडी मारली तो अतिशय खोलगट भाग आहे. त्यातच पाण्याला वेग असल्यामुळे त्यांची जीव वाचवण्याची धडपड अवघ्या दोन मिनिटात थांबली. नव्या पुलाखालून ते जुन्या पुलापर्यंत वाहत गेले. तेथे त्यांना बाहेर काढण्यात येऊन गंगापूरच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून काकासाहेब यांना मृत घोषित केले. त्यानंतर आंदोलकांनी काकासाहेब यांचा मृतदेह गंगापूर पोलीस ठाण्यात आणला. मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. पोलीस ठाण्यासमोर हजारो संतप्त कार्यकत्र्यांचा जमाव गोळा झाला असून मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे.

पोलिसांनी बळी घेतल्याचा आरोप
काकासाहेब यांनी उडी मारताच त्यांना वाचवण्यासाठी युवा सेनेचे संतोष माने यांच्यासह शिवसैनिकांनी प्रचंड धावपळ केली. काही तरुणांनी उड्या मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी उडी मारण्यास मज्जाव केला. तरीही काही तरुणांनी पुढे जाण्यासाठी धडपड केली, मात्र पोलिसांनी त्यांना दडपशाही करून गाडीत कोंबले. मोठे आंदोलन होत आहे हे माहिती असूनही तहसीलदार या ठिकाणी आले नाहीत. प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून फक्त तलाठी हजर होता. काकासाहेब यांचा बळी पोलिसांच्या बेपर्वाईने घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

संतप्त पडसाद, दगडफेक
मराठा आरक्षण आंदोलनात काकासाहेब शिंदे यांचा बळी गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे सर्वत्र पसरले. गंगापूर शहरात शिवाजी चौक परिसरात आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. काही वाहनांची तोडफोडही करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही या आंदोलकांनी केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सानप हे कायगाव येथे आले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आंदोलकांनी त्यांना पिटाळून लावले. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेत आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने नगर रोडवर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या आंदोलनात सकल मराठा समितीबरोबर शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, जिल्हा युवा अधिकारी संतोष माने, मच्छिंद्र देवकर, गणेश राऊत, दिलीप निर्फळ, कारभारी दुबिले, विनोद काळे, शिवाजी बोडखे, सूर्यकांत थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश्वर नीळ, वाल्मिक शिरसाट, काँग्रेसचे संतोष जाधव, अण्णासाहेब जाधव, मच्छिंद्र पठाडे, मच्छिंद्र देवकर, विनोद काळे, दिलीप निर्फळ, गणेश राऊत यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले आहेत

 

Best Reader's Review