मराठा तरुणाच्या आत्महत्येस मुख्यमंत्री जबाबदार, पोलिसात तक्रार दाखल

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 24-07-2018 | 01:22:21 am
  • 5 comments

मराठा तरुणाच्या आत्महत्येस मुख्यमंत्री

जबाबदार, पोलिसात तक्रार दाखल

परळी वैजनाथ

गंगापूर येथील तरुणाने केलेल्या आत्महत्येस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अमित घाडगे यांनी हा तक्रार अर्ज सोमवारी सायंकाळी परळी शहर पोलीस ठाण्यास दिला असून, मुख्यमंत्र्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

 

या तक्रार अर्जात नमुद करण्यात आले आहे की, १८ जुलै पासून परळीत मराठा समाजाला आरक्षण व मेगा भरती रद्द करावी यासाठी आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यभरात आंदोलने होत आहेत .परंतू राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जुलै रोजी एक वक्तव्य करत ‘मी मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही तसेच मेगा नोकर भरती होणार’, असे वक्तव्य केल्याने मराठा समाजातील तरुणांमध्ये एक नैराश्याची भावना निर्माण झाली होती. या नैराश्यातून सोमवारी दुपारच्या सुमारास गंगापूर येथील काकासाहेब दत्तात्रय शिंदे यांनी जलसमाधी घेऊन आत्महत्या केली. या तरुणाच्या आत्महत्येस मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य कारणीभूत असल्याचे या तक्रार अर्जात म्हटले असून, हा अर्ज सोमवारी सायंकाळी परळी शहर पोलीस ठाण्यात अमित प्रल्हादराव घाडगे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आला आहे.

Best Reader's Review