बीडमध्ये सहावे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलन

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 21-04-2018 | 12:01:41 am
  • 5 comments

बीडमध्ये  सहावे राज्यस्तरीय

व्यसनमुक्ती साहित्य संमेलन

बीड, दि. २० : बीड येथे दोन दिवस चालणाऱ्या सहाव्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही सकाळी 9 वाजता व्यसनमुक्ती दिंडी निघणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माने कॉम्लेक्स पर्यंत काढण्यात येणाऱ्या दिंडी आणि दोन दिवस चालणाऱ्या व्यसनमुक्ती साहित्य संमेलनात युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे.
 
बीड येथे दिनांक 21 व 22 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आहेत. संमेलनाध्यक्ष महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार विनायक मेटे आहेत तर पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, अभिनेते मकरंद अनासपुरे हे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
राज्यातील युवकांनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर रहाण्याची आवश्यकता असून जगातील सर्व व्यवस्थांच्या मुळाशी माणूस आहे.  आणि त्या माणसात परिवर्तन घडवायचे असेल तर त्याच्या नेणिवेत परिवर्तन घडवून आणावे लागेल. चांगल्या समाजात व्यसनाकडे झुकलेला माणूस कधीतरी चांगला होता. मात्र त्याच्या जाणीवा आणि त्याच्या नेणिवांमध्ये विपरीत परिवर्तन आल्यामुळे तो आज व्यसनी म्हणून ओळखला जातो. त्याच्या ठायी असलेली ऊर्जा, उर्मी, प्रतिभा, विचार संकुचित होतो. त्यालाही याची जाणीव होते मात्र त्याच्याही बालपणात व्यसनी लोकांना मिळणारी हीन दर्जाची वागणूक त्याच्या वाट्याला येत असल्यामुळे तो  चांगला व्यक्ती बनण्याची  हिंमत करू शकत  नाही. तेव्हा युवकांनी याबाबतचे प्रबोधानाचे विचार समजून घेण्यासाठी या दोन दिवसीय संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे बडोले यांनी प्रसिध्दी पत्रकात अधोरेखित केले आहे.
 
21 एप्रिल रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे पहिले सत्र 2.30 ते 4 वाजेपर्यंत होणार आहे. यामध्ये व्यसनाधिनता व उद्ध्वस्त कुटुंब या विषयावर चर्चा होणार असून यामध्ये खासदार डॉ.प्रितम मुंडे, आमदार प्रणिती शिंदे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, मानसोपचार तज्ज्ञ मुक्ता पुणतांबेकर, साम टिव्हीच्या ज्येष्ठ वृत्त निवेदिका वृषाली यादव यांचा सहभाग राहणार आहे.
 
दुसरे सत्र व्यसन-फॅशन की पॅशन या विषयावर सायंकाळी  4 ते 5.30 या दरम्यान होणार आहे. यामध्ये औरंगाबाद विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ  उदय वारुंजीकर, अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्ती क्षेत्र कार्यकर्ते अविनाश पाटील, व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ.कल्याण गंगवाल, साम टिव्हीचे कार्यकारी संपादक निलेश खरे, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांचा सहभाग राहणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे व्यसनमुक्तीवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
 
रविवार दि. 22 एप्रिल रोजी  यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत नशाबंदी मंडळ यांचा स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. सकाळी  10 ते  11.30 पर्यंत संमेलनाचे तीसरे सत्र होणार असून यामध्ये व्यसन-हास्य कवी संमेलन होणार आहे. यामध्ये नारायण सुमंत-कोल्हापूर, प्रभाकर साळेगावकर-माजलगाव, सुरेशकुमार लोंढे-सोलापूर, अबेद शेख-यवतमाळ, श्रीमती लता येवळे-सांगली, नारायण पुरी-नांदेड, सत्यप्रेम लगड-बीड हे सहभागी होणार आहेत.
 
चौथे सत्र व्यसनमुक्ती व माध्यमांची जबाबदारी या विषयावर सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणार आहे. यामध्ये सामान्य प्रशासन विभागाचे सचिव महेश झगडे, मिरर नाऊचे कार्यकारी संपादक मंदार फणसे, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर, झी-24 तासचे अजित चव्हाण, लेखक अरविंद जगताप, व्यसनमुक्ती कार्यकर्ते अमोल मडामे हे सहभागी होणार आहेत. दुपारी 2 वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवापुरस्काराचा वितरण सोहळा माने कॉम्प्लेक्स समोर होणार आहे. समाजातील व्यसनाधीनता घालवण्यासाठी व्यसनाधीनता हा आजार आहे आणि प्रत्येक आजारावर उपचार आहेत हे एकदा मान्य केले की या सामाजिक समस्येतून व्यक्तीला मुक्त होता येते, ही बाब समाज मनावर बिंबवण्याची आवश्यकता आहे, असेही बडोले यांनी नमूद करत युवकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

Best Reader's Review