राज्याच्या विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 20-04-2018 | 12:09:28 am
  • 5 comments

विकासासाठी शासनाचे सर्वतोपरी

प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परभणी येथे विविध विकासकामांचे ई-भुमिपुजन, लोकार्पण सोहळा
 
परभणी, दि. १९ : राज्यातील रस्ते विकासासाठी आत्तापर्यंत 5 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. गेल्या 67 वर्षात केवळ 5 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग झाले हेाते मात्र गेल्या साडेतीन वर्षांत 15 हजार किमीच्या रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी काही रस्त्यांची कामे सुरू झाली असून उर्वरित कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू असून राज्याच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
 
परभणी येथे विविध विकासकामांचे ई-भुमिपुजन, लोकार्पण सोहळा व विस्तारित समाधान योजनेच्या समारोप प्रसंगी ते बोलत हेाते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार रामराव वडकुते, मोहन फड, महापौर मीनाताई वरपुडकर, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर आदी उपस्थित हेाते.
 

 

 
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्ह्यातील शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांना श्रध्दांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांना 25 लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला. समाधान शिबिराच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्रांचे वाटपही यावेळी करण्यात आले.
 
श्री. फडणवीस म्हणाले की, परभणी जिल्हा हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. त्यामुळे परभणीचा आणि पर्यायाने राज्याचा विकास साध्य करण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार असून सुमारे 7900 कोटींच्या विविध विकासकामांच्या योजनांच्या अंमलबजावणीद्वारे परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. समाधान शिबीराअंतर्गत जिल्ह्यात 2 लाख लोकांना विविध योजनांचा लाभ झाला असून ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ‘सेवा हमी कायद्या’ मुळे नागरिकांच्या अर्जांचा विहित मुदतीत निपटारा होत आहे. परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी गेल्या साडेतीन वर्षांत 7931 कोटी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. याअंतर्गत निम्न दुधना प्रकल्पाचे काम पूर्ण सुरू झाले आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेमुळे 52 हजार टीसीएम एवढा पाणीसाठा निर्माण झाला असून 458 गांवे दुष्काळमुक्त करण्यात आली आहेत. जिल्ह्यात 2016 मध्ये 295 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता मात्र आज केवळ 10 टँकर सुरू आहेत. मागेल त्याला शेततळे या माध्यमातून जिल्ह्यात 4 हजार शेततळे देण्यात आले आहेत. 1510 सिंचन विहीर तयार करण्यात आल्या आहेत. अखंडीत वीजपुरवठा करण्यासाठी 33 केव्हीचे 20 केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात 753 कोटी रुपये 1 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. 2019 पर्यंत सामान्य माणसाला घरे देण्यात येणार असून राज्याला बेघरमुक्त महाराष्ट्र बनविण्याचे स्वप्न आहे. परभणी जिल्ह्यातील घरांसाठी असणारे प्रस्ताव शासनाकडे पाठवा त्या सर्व प्रस्तावाला तात्काळ मान्यता देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
  
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, मराठवाड्याचा सर्वांगिण विकास करायचा असेल तर पाणी, रस्ते, वीज आणि दळणवळणाची साधने निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. राज्याच्या विकासासाठी 5 लाख कोटी रुपयांची कामे करणार असून त्यापैकी 1 लाख कोटी रुपयांची कामे मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात येणार आहेत. परभणी जिल्ह्यातील 10 राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपुजन झाले असून या कामांवर 2196 कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. तसेच इतर 13 कामांसाठी 5 हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. याअंतर्गत परभणी बाह्यवळण रस्ता, देवगांव फाटा ते पाथरी, पाथरी ते इंजेगाव या रस्त्यांचा समावेश असून येत्या 3 महिन्यात ही कामे सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, समाधान शिबिराच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला गॅस योजना अशा अनेक योजनांचा लाभ वंचितांना देण्यात आला आहे. या शिबीराच्या यशस्वीतेमध्ये अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग आहे. स्वच्छतेच्या बाबतीतही राज्य आघाडीवर असून आज संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त झाला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Best Reader's Review