शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचेपर्यंत स्वस्थ बसणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 19-04-2018 | 11:50:43 pm
  • 5 comments

शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचेपर्यंत

स्वस्थ बसणार नाही - मुख्यमंत्री  फडणवीस

बीड येथे राष्ट्रीय महामार्गाच्या विविध कामांचे भूमीपूजन

बीड, दि. १९ : राज्य शासन गरिबांच्या सर्वांगीण विकासाकरिता एका निश्चित ध्येयाने काम करणारे शासन आहे. हेच स्व.गोपीनाथराव मुंडे यांचेही स्वप्न होते आणि ही स्वप्नपूर्ती पूर्ण होईपर्यंत माझ्यासह माझे मंत्रीमंडळातील सहकारी स्वस्थ बसणार नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अंबाजोगाई येथे केले.
 
राष्ट्रीय महामार्गाच्या विविध कामांचा भूमीपूजन समारंभ जिल्ह्यातील अंबा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. हे भूमीपूजन केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने करण्यात आले. यावेळी बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, खासदार रावसाहेब दानवे, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुनिल गायकवाड, सर्वश्री आमदार जयदत्त क्षीरसागर, भिमराव धोंडे, आर.टी. देशमुख, लक्ष्मण पवार, आमदार संगिता ठोंबरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता विजय गोल्हार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राजकारणात ज्यांचा हात धरुन समाज विकासाची शिकवण मिळाली अशा स्व. गोपीनाथरावांच्या जिल्ह्याचा विकास करणे हे आमचे  कर्तव्यच आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून रस्त्यांसाठी सर्वात जास्त निधी बीड जिल्ह्याला मिळाला आहे. रस्ते ही विकासासाठी एक महत्वाची बाब आहे. रस्त्यांमुळे अर्थव्यवस्था झपाट्याने प्रगतशील होते. बीड जिल्ह्यातही रस्त्यांचे मोठे जाळे उभे राहत असल्यामुळे आता विकासही झपाट्याने होईल. गेल्या 67 वर्षात राज्यात 5 हजार कि. मी. चे काम झाले आहे. मात्र या शासनाच्या कार्यकाळात म्हणजे फक्त साडेतीन वर्षाच्या कालावधीत राज्यात जवळपास 20 हजार कि. मी. रस्त्यांचे जाळे उभे राहत आहे. ज्याप्रमाणे शहरातील, गावाजवळील मुख्य रस्ते चांगले होत आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून गावातील रस्तेही चांगले होण्यासाठी हे शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. या योजनेच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात गावागावातून 30 हजार कि. मी. रस्त्यांची कामे झाली आहेत असे सांगून ते म्हणाले, महाराष्ट्र राज्याने मिशन मोडवर काम करुन 100 टक्के हगणदारीमुक्त राज्य म्हणून नावलौकिक मिळविणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. गेल्या 67 वर्षात 50 लाख शौचालय बांधून पूर्ण झाली मात्र गेल्या तीन वर्षापासून मार्च 2018 पर्यंत या शासनाने अहोरात्र मेहनत घेऊन 60 लाख शौचालये बांधून पूर्ण केली याचबरोबर या राज्यात प्रत्येक बेघर व्यक्तीला घर मिळेल यासाठी आता मिशनमोडवर काम करायचे आहे. वर्ष 2019 पर्यंत या राज्यात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, हा संकल्पच या शासनाने केला आहे. आतापर्यंत नोंदणी झालेल्यांना येत्या तीन महिन्यात घरासाठी पहिला हप्ता तर पुढील दोन वर्षात उर्वरित दोन हप्ते देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, बीड जिल्हा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत प्रथम क्रमांकावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून बीडमधील जवळपास 1 लाख 50 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. यासाठी आतापर्यंत 700 कोटी रु. देण्यात आले आहेत तर अजूनही ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही त्यांच्याकरिता आणखी 400 कोटी रु. देण्यात येणार आहेत.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाषणाच्या शेवटी बीड जिल्ह्याने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून उत्तम काम करुन जिल्ह्याची जलस्वयंपूर्णतेकडे यशस्वी वाटचाल केल्याबद्दल बीडच्या जनतेचे, प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचेही अभिनंदन केले.
 
यावेळी नितीन गडकरी म्हणाले, स्व.गोपीनाथरावांमुळे या जिल्ह्यात अनेक वेळा येण्याची संधी मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाकडून आतापर्यंत १० हजार कोटी रुपयांची कामे होत आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक कामे खासदार प्रीतम मुंडेंच्या मतदारसंघात होत आहेत. बीड जिल्ह्यातील जुन्या धरणांच्या कामात लक्ष घालणार असून  ती कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. त्यासाठी 2 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्यात साखर कारखान्यांची स्थिती चांगली नाही, ऊसाचे दर वाढले आहेत तर साखरेचे दर कमी होत आहेत. ऊस, मका, कापूस लावून भागणार नाही तर शेतकऱ्यांनी मळीपासून गॅस, वीज तयार करण्याचे तंत्रज्ञान शिकणे ही गरज बनली आहे. बायोइंधन ही संकल्पना या राज्यात यशस्वीपणे राबविली जावू शकते,  शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर वाहने चालू शकतात, शेतातल्या टाकाऊ वस्तूपासून इथेनॉलचे सेकंड जनरेशन तयार होईल, येणाऱ्या काळात इंधनाऐवजी इथेनॉल हा एक उत्तम पर्याय आहे. इलेक्ट्रीक बाईक, वाहने हा पुढील काळासाठी एक आवश्यक पर्याय बनला आहे, असे सांगून ते म्हणाले, यापुढे शेतकरी बायोइंधन, बायोप्लास्टिक तयार करेल अशी व्यवस्था या राज्यात हे शासन तयार करेल. महाराष्ट्र बदलत आहे, राज्यात  पाणी, वीज, रस्ते अशी  लोकांच्या प्राथमिक गरजा भागविणारी व राज्याच्या आर्थिक व्यवस्थेला बळकटी देणारी कामे होत आहेत. चायनीज टेक्नॉलॉजीचा वापर करुन या राज्यात स्वस्त घरेही गरजूंना मिळण्यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोफलवार यांनी केले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बीड जिल्ह्याच्या विकासात्मक घोडदौडीसाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाने केलेल्या सहकार्याचा विशेष उल्लेख करुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानले.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रमेश पोकळे तर आभार आमदार संगिता ठोंबरे यांनी मानले. या समारंभासाठी औरंगाबाद परिक्षेत्राची विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, फूलचंद कराड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, महिला आयोगाच्या सदस्या गयाताई कराड, आमदार गोविंद केंद्रे  रमेश आडसकर, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती संतोष हंगे, युधजित पंडित, अधिकारी,पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Best Reader's Review