बीडमध्ये 2019 पर्यंत रेल्वे धावणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 16-02-2018 | 12:40:43 am
  • 5 comments

बीडमध्ये 2019 पर्यंत रेल्वे धावणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री क्षेत्र नारायण गडावरील विविध विकासकामांचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण
 
बीड, दि. १५ : सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या सेवेची संधी मिळाली आहे. या संधीच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून सत्ता हे सेवेचे माध्यम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
श्री क्षेत्र नारायण गडावरील विविध विकासकामांच्या भूमिपूजन व कोनशिला अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे, श्री क्षेत्र नारायण गड देवस्थानचे महंत शिवाजी महाराज, माजी राज्यमंत्री सुरेश धस, बदामराव पंडित, आमदार सर्वश्री विनायक मेटे, भिमराव धोंडे, लक्ष्मण पवार, आर.टी. देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हेर, विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, श्री क्षेत्र नारायण गडाच्या विविध विकास कामांसाठी 25 कोटींच्या निधी आराखड्यास शासनाने मंजुरी दिली असून 2 कोटींच्या निधीचे प्रत्यक्ष वितरण केलेले आहे. तसेच शासनाकडून श्री क्षेत्र नारायण गडाचा सुनियोजित पद्धतीने विकासात्मक कामे करुन गडाला सुशोभित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
 
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सन 2019 पर्यंत प्रत्येक बेघर व्यक्तीला घरकुलाचा लाभ देऊन राज्य बेघरमुक्त करण्यात येणार आहे. तसेच बीडमध्ये 2019 पर्यंत रेल्वे धावणार असून यासाठीचे भूसंपादन प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बीड जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे 500 कोटी रुपये वितरित केले आहेत. तर जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत बीड जिल्ह्यात 1 लाख टीसीएम पाणीसाठा निर्माण होऊन 51 हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आल्याची माहिती श्री.फडणवीस यांनी देऊन बीड जिल्हा टँकरमुक्त झाल्याचेही त्यांनी सांगितले.
 
मराठवाड्यात कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत 1 लाख बेरोजगारांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याचा लाभ बीड जिल्ह्यातील तरुणांनाही होणार आहे तसेच राज्यातील गोर –गरीब विद्यार्थ्यासाठी छत्रपती शाहू महाराज योजना सुरु करण्यात आली असून विविध प्रकारच्या 602 अभ्यासक्रमासाठी गरीब विद्यार्थ्यांना खाजगी महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी शासन शुल्क भरणार असल्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. मागील दोन-तीन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे शासनाने तात्काळ सर्व्हेक्षण करुन पहिल्या अहवालानुसार शेतकऱ्यांना मदत जाहीर केली असून सर्व्हेक्षणाच्या दुसऱ्या अहवालात  राज्यातील एकही  नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.
 
बीड जिल्ह्यात सुमारे दहा हजार कोटींची विविध विकासात्मक कामे सुरू असून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचविला जाईल असे पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगूण जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य व केंद्राकडून मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच येथील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाशी आपली नाळ जुळली असल्याने या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 
श्री क्षेत्र नारायण गडाच्या विकासासाठी एकूण 42 कोटींच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यात 25 कोटींचा निधी मंजूर झाला असून उर्वरित निधीही लवकर मिळण्याची मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली. हा गड विकासकामांपासून वंचित असल्याने या गडाच्या विविध विकास कामांना भरीव निधीची तरतूद करुन हे क्षेत्र शैक्षणिक, आरोग्य, वैचारिक व भक्तीचे केंद्र होण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे,  याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. 
 
 
 
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्य हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि संत कुलभुषण नगद नारायण महाराजांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन वंदन करण्यात आले. तसेच यावेळी  श्री क्षेत्र नाराण गड देवस्थानच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी महंत शिवाजी महाराज यांच्या एकसष्ठी निमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार राजेंद्र जगताप यांनी तर  सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काशिद व राहुल गिरी यांनी केले.
 

Best Reader's Review