परभणी जिल्ह्यातील तीन हजार कोटींच्या विकास कामांचे ई - भूमिपूजन - बबनराव लोणीकर

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 10-02-2018 | 12:46:01 am
  • 5 comments

परभणी जिल्ह्यातील तीन हजार कोटींच्या

विकास कामांचे ई - भूमिपूजन - लोणीकर

पालम तालुक्याला तीन वर्षात २०६ कोटींचा निधी 
 
पालम ( जि. परभणी ) - केंद्र व राज्य सरकारच्या वतीने परभणी जिल्ह्यासाठी  तीन हजार कोटींच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली असून, या कामाचे ई - भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत लवकरच होणार असल्याची माहिती राज्याचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. 
पालम येथील गजानन मंगल कार्यालयात आयोजित समाधान  शिबीर पूर्वतयारी बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, भाजपाचे युवा नेते राहुल लोणीकर, गणेशदादा रोकडे, बालाजी देसाई, डॉ. प्रफुल्ल पाटील, ज्ञानोबा मुंडे, नगराध्यक्ष बालासाहेब रोकडे, विट्ठलमामा रबदाडे, व्यंकटराव तांदळे, रामकिसन खादलें, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, प्रकल्प संचालक प्रतापराव सवडे, डॉ. सुभाष कदम, साहेबराव शिरसकर आदींची उपस्थिती होती. 
लोणीकर पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षात पालम तालुक्यात जलयुक्त शिवारासाठी २४ कोटी ७३ लाख, दुष्काळी अनुदान ४९ कोटी ३२ लाख, पिके विमा अनुदान ५२ कोटी १८ लाख, सा.बा. विभागाचे रस्ते १५ कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ते १४ कोटी ३८ लाख, ग्रामीण पाणीपुरवठा योजना ९ कोटी १६
लाख स्वछ भारत अभियानासाठी ६ कोटी ९३ लाख, नगर परिषदांना अनुदाने ५ कोटी २१ लाख, महावितरण २ उपकेंद्र व विदुतीकरण १७ कोटी इत्यादी कामांचा समावेश आहे, असे लोणीकर यांनी सांगितले. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी समाधान शिबिराच्या माध्यमातून परभणी व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी एक लाख अशा दोन लाख लोकांना विविध योजनेअंतर्गत लाभांचे वाटप केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिलेल्या विविध राष्ट्रीय महामार्गांच्या कामांचे ई - भूमिपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये जिंतूर- औंढा नागनाथ-शिरड शहापूर हा ७० कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी ६१८ कोटी, जिंतूर-बोरी-झरी-परभणी ३८ कि.मी., २७२ कोटी, परभणी-दैठण-गंगाखेड ३६ कि.मी. २५७ कोटी, गंगाखेड-किनगाव ३६ कि.मी. २२६ कोटी, पाथरी-सेलू-देवगाव फाटा ४३ कि.मी. २८६ कोटी, इंजेगाव-पाथरी ४१ कि.मी. २७३ कोटी, कोल्हा-नसरतपूर ५२ कि.मी. २८२ कोटी, परभणी वळण रास्ता १४. ५ कि.मी. ५५३ कोटी या कामांचा समावेश आहे, असे  लोणीकर यांनी सांगितले. 
यावेळी  लोणीकर यांच्या हस्ते विविध योजनेतील लाभार्थ्यांना लाभांचे वाटप करण्यात आले. यात पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र, उजवला गॅस योजनेअंतर्गत गॅस वाटप, बचत गटाच्या महिलांना प्रत्येकी एक लाखांचे धनादेश वाटप करण्यात आले.

Best Reader's Review