देशभक्तांच्या त्याग व बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा लाभ जनसामान्यांना व्हावा- गुलाबराव पाटील

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 26-01-2018 | 07:32:36 pm
  • 5 comments

देशभक्तांच्या त्याग व बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचालाभ जनसामान्यांना व्हावा- पाटील

 

 

 

 

स्वातंत्र्याचा लाभ जनसामान्यांना व्हावा- पालकमंत्री गुलाबराव पाटील
 
 परभणी, दि.26 :- अनेक देशभक्तांच्या त्याग बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचा लाभ जनसामान्यांना व्हावा यासाठी व्रतस्थ होण्याचा हा दिवस असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाच्या 68 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण सहकार राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उज्वला राठोड, खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील, आमदार मोहन फड, महापौर मिनाताई वरपुडकर, जि.प.उपाध्यक्षा भावनाताई नखाते, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, पोलिस अधिक्षक दिलीप झळके, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, महानगरपालिका आयुक्त राहुल रेखावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की,  देशाने संविधानाचा स्विकार करुन लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात या दिवशी केली म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करीत असतो. अनेक थोर नेत्यांनी या स्वतंत्र भारतातील लोकशाही व्यवस्थेची मजबूत पायाभरणी केली त्यांच्यासह इतर अनेक महनीय नेत्यांनी पवित्र राज्यघटनेच्या रुपाने जनकल्याणाचा आदर्श दस्तावेज देशासमोरच नव्हे तर जगासमोर ठेवला आहे. देशाच्या समर्थ उभारणीमध्ये युवकांचा मोठा वाटा असून इंटरनेट आणि स्मार्ट फोनच्या आधुनिक युगात आपली युवा पिढी यासाठी अधिक अग्रेसर राहील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
 पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले की, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हा सार्वभौम, धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक देश असून आपण त्रिस्तरीय लोकशाही पध्दत स्विकारली आहे. ही लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने 1992 मध्ये 73 व 74 व्या घटना दुरुस्तीद्वारे स्थानिक स्वराज्य संस्थांना सांविधानिक मान्यता देण्यात आली. या घटना दुरुस्तीय 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकशाही, निवडणूका व सुशासन या विषयावर राज्यात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. स्वातंत्र्यानंतर आजही देशासमोर मोठी आव्हाने आहेत. राज्यात मुलींची गर्भातच हत्या करण्याची प्रवृत्ती अत्यंत क्लेशदायक असून यासाठी पीसीपीएनडीटी सारखा कायदा करण्याची वेळ येणे हीच खरी शोकांतिका आहे असे सांगून प्रत्येक नागरिकाने आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या आनंदात सहभागी होऊन देशाला बलशाली करण्यासाठी पुढाकार असे आवाहनही त्यांनी केले.
            जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक व क्रीडा कार्यकर्ता यांचा गौरव व्हावा यासाठी क्रीडा कार्यकर्ता शंकर शहाणे, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक अमृत मुंडे, गुणवंत महिला खेळाडू प्रिया कांबळे, गुणवंत खेळाडू महेशकुमार काळदाते यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच जिल्हा युवा पुरस्कारामध्ये महिला स्वसंरक्षण क्षेत्रात कार्य केल्याबद्दल गुणवंत युवती कार्यकर्ता सरीता येलपुल्ला, युवा क्षेत्रात कार्य करुन जनजागृती केल्याबद्दल गुणवंत युवा कार्यकर्ता म्हणून साईनाथ गरड आणि जिल्ह्यात व्यसनमुक्ती व समाजविकासामध्ये योगदान दिल्याबद्दल गुणवंत जिल्हा युवा संस्था म्हणून युगांधर फाऊंडेशन परभणी यांना पुरस्कार देण्यात आला. लोकमत मॅरेथॉन 21 किलोमिटर द्वितीय व नाशिक मॅरेथॉन 10 कि.मी.मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल परभणी तहसिल कार्यालयातील शिपाई लक्ष्मण शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस दल, गृहरक्षक दल, एनसीसी, सैनिकी शाळा, बॉम्ब नाशक पथक, मोबाईल फॉरेन्सीक लॅब, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, वन विभाग यांनी परेड संचालनातून मानवंदना देण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
            यावेळी पालकमंत्री श्री.पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांची भेट देवून विचारपूस केली. या ध्वजारोहण समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Best Reader's Review