महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 11-03-2019 | 11:25:15 pm
  • 5 comments

महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना

‘नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज जागतिक महिला दिनी महाराष्ट्रातील सहा कर्तृत्ववान महिलांना प्रतिष्ठित ‘नारी शक्ती’पुरस्काराने गौरविण्यात आले.
 
केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने आज राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या देशभरातील ४४ महिलांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी,केंद्रीय कृषी राज्यमंत्री कृष्णा राज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
महाराष्ट्रातील महिलांमध्ये मुंबईतील सीमा राव, स्मृती मोरारका, कल्पना सरोज, सीमा मेहता, अहमदनगर जिल्ह्याच्या राहीबाई पोपरे, सातारा जिल्ह्याच्या चेतना गाला सिन्हा यांना सन्मानित करण्यात आले.
 
‘नारी शक्ती’ पुरस्कारप्राप्त महाराष्ट्रातील महिलांविषयी
 
कमांडो प्रशिक्षक सीमा राव
 
मुंबईच्या सीमा राव या देशातील एकमेव महिला कमांडो प्रशिक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत सशस्त्र व अर्ध सैन्यदलाच्या १५ हजारांपेक्षा अधिक सैनिकांना प्रशिक्षित केले. यामधे  शस्त्रदल, वायुदल  व नौदलातील सैनिक, राष्ट्रीय सुरक्षा दलातील सैनिक, भारत तिबेट सीमा पोलीस आदींना सीमा राव यांनी प्रशिक्षित केले आहे. लैंगिक शोषण पीडित महिलांसाठी सीमा राव यांनी 'डेअर' हा विशेष कार्यक्रम राबवीला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत ‘नारी शक्ती’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
कथ्थक नृत्यांगना सीमा मेहता
 
मुंबईच्या सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यागंना सीमा मेहता यांनी पंडीत चित्रेश दास यांच्याकडून कथ्थकचे धडे गिरविले. ‘छदम नृत्य भारती’ या नृत्य संस्थेच्या माध्यमातून सीमा मेहता कथ्थक नृत्याचे शिक्षण देतात. विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने त्या गरीब मुला-मुलींना नृत्य क्षेत्रात करियर करण्यासाठी प्रोत्साहित करतात. त्यांच्या नृत्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.
 
 उद्योजिका कल्पना सरोज
 
छोट्या गावातून प्रवास सुरू करत देशातील अग्रगण्य उद्योजिका म्हणून असलेल्या पद्मश्री उद्योजिका कल्पना सरोज यांनी उद्योग क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाने ठसा उमटविला आहे. आज त्यांनी स्थापित केलेल्या उद्योग क्षेत्रात हजारो महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना गौरविण्यात आले.
 
‘तंतुवी’ संस्थेच्या स्मृती मोरारका
 
मुंबईच्या स्मृती मोरारका यांनी ‘तंतुवी’ या संस्थेच्या माध्यमातून बनारस येथील पारंपरिक हातमाग क्षेत्रातील कारागिरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हातमाग समुहाची सुरूवात केली. त्यांच्या या संस्थेच्या माध्यमातून कित्येक हातमाग कारागीरांच्या हाताला काम मिळाले.  त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘नारी शक्ती’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
 
‘सीड मदर’ राहीबाई पोपरे
अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील कोभाळणे येथील ‘सीड मदर’म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे यांनी गावरान आणि जैवविविधता असलेल्या पिकांच्या जातींचे जतन केले आहे. त्यांना कृषी क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी ‘नारी शक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
माणदेशी महिला सहकारी बँकेच्या चेतना गाला सिन्हा
सातारा जिल्ह्यातील ‘माणदेशी महिला सहकारी बँके'च्या संस्थापिका चेतना गाला सिन्हा यांनी या बँकेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रातील महिलांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ग्रामीण महिला आर्थिकरित्या सक्षम झाल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवाना मिळवणारी ही पहिली ग्रामीण भागातील सहकारी बँक आहे. ग्रामीण महिलांचे आयुष्य या सहकारी बँकेमुळे बदलण्याचे संपूर्ण श्रेय चेतना गाला सिन्हा यांना जाते. त्यांच्या या कामाची दखल म्हणून आज त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
सिस्टर शिवानी यांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार
पुण्यात जन्मलेल्या शिवानी वर्मा ब्रह्मा कुमारी शिवानी अथवा सिस्टर शिवानी म्हणून परिचित आहेत. ब्रह्मा कुमारी विश्व आध्यात्मिक विद्यापीठात शिक्षिका म्हणून कार्यरत शिवानी एक प्रेरक वक्ता आहेत. मानवी व्यवहार संबंधित विषयांवर प्रेरक अभ्यासक्रम, सार्वजनिक कार्यक्रम, दूरचित्रवाणीवर कार्यक्रम करतात. सिस्टर शिवानी यांच्या प्रेरणादायी प्रवचनांनी लाखो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडला आहे. सिस्टर शिवानी यांचे भारतभर विविध आध्यात्मिक कार्यक्रम सुरू असतात. त्यांनी लोकांच्या जीवनात घडविलेल्या बदलाबद्दल त्यांना आज नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Best Reader's Review