Breaking News

‘मुख्यमंत्री शिशू स्वागत किट’ योजनेचा शुभारंभ

  • Post By आज दिनांक वेब टीम | Tue 29-01-2019 | 11:57:14 pm
  • 5 comments

‘मुख्यमंत्री शिशू स्वागत किट’ योजनेचा शुभारंभ

बालमृत्यू, कुपोषण रोखण्याबरोबरच बालसंगोपनाच्या दृष्टीने योजना महत्त्वपूर्ण ठरेल - महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे

 

मुंबई, दि. 29 :  बालमृत्यू तसेच कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात जन्मणाऱ्या नवजात बालकांना आता ब्लँकेट, मच्छरदाणी, छोटा नेलकटर,इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर, झोपण्याची लहान गादी, प्लास्टिक लंगोट, हातमोजे,पायमोजे इत्यादी साहित्याचा समावेश असणारे ‘मुख्यमंत्री शिशू स्वागत किट’देण्यात येणार आहे. या योजनेचा आज महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. नुकत्याच साजऱ्या झालेल्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यात ही योजना राबविण्यास सुरुवात झाली असून शासकीय रुग्णालयात होणाऱ्या कोणत्याही महिलेच्या पहिल्या प्रसूतीवेळी मुलांच्या संगोपनासाठी राज्य शासनामार्फत हे किट मोफत देण्यात येणार आहे.
मंत्रालयात आज झालेल्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते काही गरोदर महिला आणि स्तनदा मातांना या ‘मुख्यमंत्री शिशू स्वागत किट’चे वाटप करण्यात आले. यावेळी महिला आणि बालविकास विभागाच्या सचिव विनिता सिंगल, एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाच्या आयुक्त इंद्रा मालो, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, सहसचिव लालसिंग गुजर, उपसचिव स्मिता निवतकर, कक्ष अधिकारी रमेश सरफरे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या, बालमृत्यू कमी करण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प आणि आरोग्य विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी भागात बऱ्याच वेळा नवजात बालकाला सारवलेल्या जमिनीवर ठेवले जाते. अशा वेळी जमिनीतील थंडाव्यामुळे बाळ आजारी पडते. त्यामुळे बालकांची काळजी कशी घ्यावी याबाबत अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत मातांना शिक्षण दिले जात आहे. पण त्याचबरोबर बाळाला उब मिळेल, त्याची स्वच्छता राखली जाऊ शकेल अशा प्रकारच्या साहित्याची कीट नवजात बालकांना शासनामार्फत मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेसाठी पहिल्या टप्प्यात २०कोटी रुपयांची उपलब्धता करण्यात आली असून भविष्यात ही तरतूद वाढविण्यात येईल. राज्याच्या सर्व भागात तसेच सर्व सामाजिक घटकांसाठी ही योजना लागू असेल, असे त्यांनी सांगितले.          
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या समाजातील सर्व घटकांमधील नवजात बालकांना संबंधित महिलेच्या पहिल्या प्रसूतीवेळी हे किट मोफत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिशू स्वागत किट योजना म्हणून ही योजना ओळखली जाईल. राज्यात सर्वसाधारणपणे वीस लाख महिला वर्षाला प्रसूत होत असतात. त्यापैकी आठ लाख महिला शहरी भागात व बारा लाख महिला आदिवासी किंवा ग्रामीण भागात प्रसूत होत असतात. त्यापैकी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात प्रसुती होणाऱ्या महिलांची संख्या ही दहा लाखाच्या आसपास आहे. त्यामध्ये पहिल्या प्रसुतीची संख्या सर्वसाधारणपणे चार लाखाच्या आसपास आहे. या नवजात बालकांना हे किट देण्यात येणार आहे.
या किटमध्ये कमाल 2 हजार रुपये इतक्या रकमेचे साहित्य असेल. त्यात लहान मुलांचे कपडे, प्लास्टिक लंगोट, झोपण्याची लहान गादी, लहान टॉवेल,तापमापक यंत्र (इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर), मुलांना अंगाला लावावयाचे तेल,मच्छरदाणी, ब्लँकेट, लहान चटई, लहान मुलांचा शाम्पू, खेळणी, खुळखुळा,लहान नेलकटर, बाळासाठी हातमोजे व पायमोजे, आईसाठी हात धुण्याचे लिक्विड, बाळाला गुंडाळून ठेवण्यासाठी कापड, आईसाठी लोकरीचे कापड, बॉडी वॉश लिक्विड, हे सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग यांचा किटमध्ये समावेश असेल.
 
ठळक मुद्दे -
·        आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू राज्यामध्ये योजना सुरू, बालमृत्यू कमी करण्यात यश
·        किटमधील वस्तूंची निवड आरोग्य विभागाच्या व  विशेषज्ञांचा सल्ल्याने
·        विशेषकरुन आदिवासी, ग्रामीण आणि बालमृत्यूचे प्रमाण अधिक असलेल्या भागामध्ये पुरविण्यात येणार किट. शहरी भागातही योजना लागू.
·        पहिल्या टप्प्यात रु. 20 कोटी निधीची तरतूद

Best Reader's Review