अखेर चर्चेस सुरुवात

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 16-12-2016 | 12:04:57 pm
  • 5 comments


गत काही दिवसांपासून राज्यभरात निघत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाची सरकारने बरीच गंभीर दखल अनेकवेळा चर्चेचीही तयारी दाखविली होती. मात्र, ठिकठिकाणी निघणाऱ्या या भव्य मोर्चात 5 मुलींच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले जात होते. प्रामुख्याने राजकीय मंडळीला बाजूला सारुन स्थानिक मान्यवरांच्या पुढाकाराने हे मोर्चे निघत होते. त्यामुळे या मोर्चांना राज्यात आणि राज्याबाहेर विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. तथापि, सरकारने अनेकदा चर्चेची तयारी दाखविलीत होती. परंतू, नेमकी चर्चा कोणाशी करावी, असा प्रश्न कायम होता. त्यातच 14 डिसेंबर रोजी नागपुर येथे निघालेला राज्यस्तरीय मोर्चाने आंदोलनाला एक नवी दिशा दिल्याचे दिसून येत आहे. हा राज्यस्तरीय मोर्चा मराठा क्रांती मोर्चाची कोंडी फोडणारा मोर्चा ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे  या मोर्चाच्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळाने विविध मागण्यासंदर्भात सरकारसोबत चर्चेची तयारी दर्शविली आहे. विशेषत: नागपूरनंतर मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येईल आणि त्यात गर्दीचे सर्व उच्चांक मोडीत निघतील, असा दावा एकीकडे संयोजकांकडून केला जात असून, दुसरीकडे सरकारकडून आिण मोर्चातील शिष्टमंडळाने चर्चेबाबत सकारात्म पाऊले उचलण्यास सुरुवात केल्याने लवकरच चर्चेच्या फेऱ्या सुरु होण्याचा अंदाज आहे. पर्यायाने मुंबईत मोर्चा काढण्यापूर्वी सरकारला काही अवधी दिला जाण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मोर्चेकऱ्यांच्यावतीने सरकारसोबत चर्चा करण्यासाठी नेमके कोण पुढे येणार, हे स्पष्ट नसलेतरी सरकारसोबत चर्चा करणाऱ्या शिष्टमंडळात मराठा समाजातील घटनातज्ञ, वकील आणि विविध क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असणार आहे हे निश्चित आहे. एकंदरीत परिस्थितीवरुन मराठा क्रांती मोर्चे आणि त्यातून होणाऱ्या मागण्यांसंदर्भात चर्चेला सुरुवात होणार हे नागपूर मोर्चाच्यानिमित्ताने  स्पष्ट होत आहे. त्यातच राज्य सरकारने आरक्षणासह बहुतांश मागण्या मान्य करण्याची यापूर्वीच तयारी दर्शविली असून, आवश्यक त्या बाबींसाठी सर्वांना एकत्रीतपणे न्यायालयात  लढण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यामुळे मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यातील चर्चेतुन अनेक सकारात्मक बाबीच समोर येतील, हे वेगळे सांगण्याची गरज नसलीतरी चर्चेत नेमके कोणत्या मुद्यांना प्राधान्य दिले जाणार, या कोणीही भाष्य केलेले नाही. त्यातच नागपुर येथील मोर्चाच्या माध्यमातून मोर्चेकऱ्यांनी सरळ बुलेट नव्हे तर बायलेटव्दारे अर्थात मतदानाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा इशाराही सरकारला दिला आहे. त्यामुळे सरकारसोबत होणाऱ्या चर्चेतुन बाहेर येणाऱ्या निष्कर्षाला विशेष महत्व प्राप्त होत आहे. सरळ मतदानातून उत्तर देण्याचा इशारा मिळाल्याने भविष्यातील राजकारणाच्यादृष्टीने  मराठा समाजाला नाराज करणे हे परवडणारे नाही, असे आता सरकारलाही लक्षात येवू लागले असून, सर्वबाजू लक्षात घेवूनच सरकार आणि मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळ यांच्यात चर्चा होईल, असा कयास आता चर्चा होणार यानिमित्ताने लावला जात आहे. असो नागपुर मोर्चाच्यानिमित्ताने काहीका होईना पण चर्चेला सुरुवात होणार, ही बाब विशेष महत्वाची मानली जात असून, या चर्चेतुन बाहेर येणारे फलीत आणि चर्चेत कुठल्या मुद्यांना प्राधान्य दिले जाते, यावर बरेच काही अवलंबून आहे, असे ठामपणे कोणी सांगत असल्यास त्यात गैर ते काही नाही, एवढे मात्र निश्चित.

Best Reader's Review