सशस्त्र दल ध्वजदिन निधी

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 15-12-2016 | 11:30:14 am
  • 5 comments

शूर सैनिक जो प्राणपणाने भारत मातेच्या रक्षणार्थ स्वत:चे बलिदान करतो. शारीरिक व मानसिक यातनांकडे व वेदनांकडे दुर्लक्ष करतो. फक्त आणि फक्त देशाचे स्वातंत्र्य, एकता व गौरव अबाधित राखण्यासाठीच झुंज देतो. वयाच्या 35-40 व्या वर्षी तो सेवानिवृत्त होतो. प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतात जवळ-जवळ 70 हजारांहून अधिक सैनिक सेवानिवृत्त होत असतात. त्यापैकी 9-10 हजार सैनिक महाराष्ट्रातील असतात. त्यानंतर त्यांना अनेक प्रकारच्या अडीअडचणींना सामोरे जावे लागते. निवृत्ती वेतनात घर चालवणे, पाल्यांचे शिक्षण, मुलींचे लग्न, वृध्द माता-पित्यांचा सांभाळ हे सर्व करत असताना त्याची तारेवरची कसरत होत असते. या परिस्थितीत सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाची जबाबदारी व त्यांचे पुनर्वसन सैनिक कल्याण विभागाद्वारे पार पाडली जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागतो. याकरिताच सैनिकांचे कल्याण व पुनर्वसनासाठी सशस्त्र दल ध्वजदिन निधी संकलन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात देशभर राबवला जातो. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी ही संकल्पना तशी खूप जुनी आहे. ब्रिटीश काळात ही पद्धत उदयास आली. सैनिक व त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी ब्रिटीश सरकार 11 नोव्हेंबर या दिवशी 'रिमेंबरन्स डे' हा दिन समारंभपूर्वक साजरा करत व त्याच दिवशी निधी संकलनाचे कार्य सुरु होत असे. पुढील संपूर्ण वर्ष हे काम सातत्याने केले जात असे आणि हा संकलित निधी केवळ ब्रिटीश सैनिक व त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी वापरला जात असे. पुढे देश स्वतंत्र झाला आणि तत्कालिन संरक्षण मंत्र्यांच्या अधिपत्याखाली जुलै 1948 मध्ये एक समिती नेमली गेली. या समितीने 28 ऑगस्ट 1949 रोजी एक अत्यंत मत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे सन 1949 पासून दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र दल ध्वजदिन म्हणून साजरा केला जाईल व त्या दिवसापासून ध्वजदिन निधी संकलन केले जाईल आणि आजतागायत ही परंपरा अगदी अबाधित आहे. यामध्ये समाजातील सर्व आबाल-वृध्दांचा समावेश करुन घेतला जातो. विशेषकरुन शाळेतील विद्यार्थ्यांच्या संवेदनशील बालमनावर राष्ट्रभक्तीची भावना अंकित व्हावी. स्वार्थत्यागाची भावना बलवंत होऊन त्यांनी स्वत:च्या खाऊच्या पैशातून दान करुन देशातील शूर-वीरांसाठी आपली कर्तव्यदक्षता दाखवावी. त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीयाच्या मनाला सैनिकांच्या परमोच्च बलिदान व त्यांच्या कार्याविषयी आत्मीयता व उदारपणा वाढीस लागावा म्हणून प्रत्येकाकडून अल्पश: स्वरुपात मदत घेतली जाते. सैनिकांना त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी अल्पस्वरुपात मदत मग ती आर्थिक असो, मानसिक असो किंवा सन्मानाच्या स्वरुपात असो. त्यांच्या कर्जातून ऋणमुक्त होण्याचा व त्यांच्या विषयी असलेला आदर व अभिमानाला उजाळा देण्याचा उदात्त हेतू यामागे दडलेला आहे. या कार्यासाठी ध्वजदिन 2015 साठी शासनाकडून महाराष्ट्र राज्यास रुपये 28 कोटी 89 लाख 26 हजारचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्यापैकी अहमदनगर जिल्ह्याला 1 कोटी 57 लाख 30 हजार निधी संकलित करण्याचा इष्टांक दिला. यावर्षीही अहमदनगर जिल्ह्याने इष्टांकापेक्षाही अधिक रक्कम संकलित केलेली आहे. गेल्या पाच वर्षांच्या निधी संकलनाचा आढावा घेतला असता शासनाने निर्धारित केलेल्या रकमेपेक्षा जास्तच रक्कम अहमदनगर जिल्ह्यातून संकलित केली जाते. प्रत्येक वर्षी निधी संकलन दर व आलेख उंचावतच चालला आहे. ही आपणा सर्वांसाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. त्याचसोबत जिल्हाधिकारी अनिल कवडे तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर मिलिंद तुंगार (नि) व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी यांच्या अथक परिश्रमांची ही पावती आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वात मोलाची कामगिरी बजावली ती जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी व त्याहून अधिक चिमुरड्या विद्यार्थ्यांनी. कारण अगदी प्राथमिक पातळीवर म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन पाच/दहा रुपये अशी रक्कम गोळा करून त्यांनी खारीचा वाटा उचलला आहे आणि 'थेंबे थेंबे तळे साचे' या उक्तीप्रमाणे हेच रुपया-दोन रुपये 1 कोटी 57लाख 30 हजारात परिवर्तित झाले. या कामी जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, महामंडळे, साखर कारखाने तसेच धार्मिक संस्थांचाही मोलाचा वाटा आहे.  अहमदनगर येथील महासैनिक संकुल येथे सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ झाला. प्रतिकूल परिस्थितीत देशांच्या सीमांचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या तसेच माजी सैनिकांच्या मनात देशातील प्रत्येक नागरिक त्यांच्या पाठिशी उभा आहे, अशी भावना निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे, असे भावोद्गार जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी यावेळी काढले.

Best Reader's Review