महाराष्ट्र स्टार्ट अपमधील आघाडी टिकवून ठेवेल - कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचा विश्वास

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 01-02-2019 | 11:13:57 pm
  • 5 comments

महाराष्ट्र स्टार्ट अपमधील आघाडी टिकवून ठेवेल -

कौशल्य विकासमंत्री संभाजी निलंगेकर यांचा विश्वास

मुंबई, दि. 1 : राज्यातील संसाधनाचा उपयोग करण्यासाठी स्टार्ट अप काम करत असून येणाऱ्या काळात स्टार्ट अप एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. आजही सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रात येत असून येणाऱ्या काळात महाराष्ट्र स्टार्ट अपमधील आघाडी टिकवून ठेवेल असा विश्वास कौशल्य विकास आणि उदयोजकतामंत्री संभाजी पाटील- निलंगेकर यांनी व्यक्त केला.
राज्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने ‘महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताह 2019’ चे आयोजन करण्यात आले आहे. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या काळात महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात आला होता. येथील हॉटेल विवांता येथे स्टार्ट अप सप्ताहाचा सांगता समारंभ कार्यक्रम पार पडला. त्यावेळी श्री. निलंगेकर यांनी स्टार्ट अपमधील महाराष्ट्राची आघाडी आणि स्टार्ट अपमुळे तरुणांना मिळणारे हक्काचे व्यासपीठ यासंदर्भात आपले विचार मांडले. यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरेंद्र सिंह उपस्थित होते.
श्री. निलंगेकर यावेळी म्हणाले, राज्यात आता कृषीसह कौशल्य, शिक्षण,तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये स्टार्ट अप सुरू झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र स्टार्टअपचे मुख्य केंद्र बनेल.'स्टार्ट अप’ कंपन्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असून अनेक नामांकित आणि विश्वासार्ह कंपन्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रात 'स्टार्ट अप’साठी पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे. 
 
स्टार्ट अप सप्ताहामुळे इच्छुक 'स्टार्ट अप'ना त्यांच्या अभिनव संकल्पनांच्या सादरीकरणासाठी नामी संधी उपलब्ध झाली असून या 'स्टार्ट अप'ना थेट राज्य शासनासोबत काम करण्याची संधी मिळणार असल्याचेही कौशल्य विकासमंत्री यांनी यावेळी सांगितले.
शिक्षण आणि कौशल्य, आरोग्य सेवा, शेती, प्रदूषण विरहित ऊर्जा, जल व कचरा व्यवस्थापन, प्रशासन, सर्वसमावेशक आर्थिक विकास या विविध क्षेत्रातील उत्कृष्ट ठरलेल्या स्टार्टअप प्रकल्पांना योवळी कौशल्य विकास मंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
2018 मध्ये पहिल्यांदा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. गेल्या वर्षी तब्बल 900 स्टार्टअप या उपक्रमात सहभागी झाले होते. उत्कृष्ट ठरलेल्या 100 स्टार्ट अपना त्यांच्या अभिनव संकल्पना उद्योग जगतातील तज्ज्ञ,गुंतवणूकदार, शासकीय अधिकारी यांच्या समोर मांडण्याची संधी मिळाली. स्टार्ट अपनी सादर केलेल्या सादरीकरणाच्या आधारे समितीमार्फत चर्चा होवून त्यातील निवडल्या गेलेल्या 24 विजेत्या स्टार्ट-अपना प्रत्येकी रु. 15लाख रुपयांपर्यंतची शासकीय कामे देण्यात येणार आहेत.

Best Reader's Review