Breaking News

महाराष्ट्राचा स्वतंत्र कौशल्य विकास विद्यापीठ कायदा करणार - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Fri 06-04-2018 | 01:35:57 am
  • 5 comments

महाराष्ट्राचा स्वतंत्र कौशल्य विकास विद्यापीठ

कायदा करणार - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. ५ : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेत महाराष्ट्राचा स्वतंत्र कौशल्य विकास विद्यापीठ कायदा करणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले
 
आज सह्याद्री अतिथीगृहात चंद्रपूर कौशल्य विकास विद्यापीठाच्या कामाचा आढावा श्री. मुनगंटीवार यांनी घेतला. बैठकीस कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, कौशल्य विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, चंद्रपूर जिल्हाधिकारी आशुतोष सलील आदी उपस्थित होते
 
महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठ कायद्याचा मसुदा 15 मे पर्यंत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले, कौशल्य विकासाशी संबंधित अभ्यासक्रमाचीही या दरम्यान निश्चिती केली जावी. कौशल्य विकास विद्यापीठाच्या बांधकामाचे डिझाईन याच काळात हाती घेण्यात यावे. चंद्रपूर कौशल्य विकास विद्यापीठ हे वनाधारित विद्यापीठ असल्याने या अनुषंगिक अभ्यासक्रम निश्चित केले जावेत. इतर कौशल्य विकास विद्यापीठांतर्गत सामील करावयाचे कौशल्य विकास अभ्यासक्रम निश्चित करताना स्थानिक कौशल्ये विचारात घेतली जावीत. तसेच उद्योगांना नेमकी कशा प्रकारच्या कुशल मनुष्यबळाची गरज आहे याचा देखील अभ्यास केला जावा.
 
कौशल्य विकास विद्यापीठ, उद्योजक आणि त्यांच्या कंपन्या यात सुसूत्रता आणि समन्वय असावा. या दृष्टीने बिग बाजार, वैद्यनाथ, वर्धा फूड प्रॉडक्ट, प्रवीण मसाले, डाबर, पतंजली, खादी ग्रामोद्योग, बी.बी.जी, सिमेंट उद्योग, फ्लाय ऐश पासून तयार होणाऱ्या वस्तू आणि त्याच्याशी संलग्न उद्योग आणि उद्योजक यांची माहिती गोळा करावी तसेच या सर्वांबरोबर एक बैठक आयोजित करावी, असे झाल्यास उत्पादीत वस्तुंना व्यापक बाजारपेठ मिळू शकेल, जे उद्योजक शासनासोबत काम करू इच्छितात त्यांच्यासोबत सामंजस्य करार करणे शक्य होईल. त्या शक्यता ही तपासल्या जाव्यात असेही ते म्हणाले. राज्यातील ६ कौशल्य विकास विद्यापीठांना केंद्र सरकार प्रत्येकी ८० कोटी याप्रमाणे ४८० कोटी रु देणार असल्याची माहितीही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
 

कौशल्य विकास विभागाने विविध संस्था, उद्योगांसमवेत कौशल्य विकासासाठी सामंजस्य करार केले आहेत त्यांची यादी विभागात तयार आहे ही माहिती कौशल्य विकास विद्यापीठाची रचना आणि अभ्यासक्रम निश्चित करताना मिळू शकेल, असे श्री. पाटील निलंगेकर यांनी यावेळी सांगितले.

Best Reader's Review