जपायचय तिला .... 'आई' ला '...

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 14-05-2017 | 05:28:19 pm
  • 5 comments

 जपायचय तिला  ....  'आई' ला '...

पृथा वीर


आई जगातला सर्वात सुंदर शब्द. या शब्दामध्ये सन्मान, प्रेम, वात्सल्य आहे आणि सार सामावल आहे. ती प्रत्येकाची हक्काची जागा. नऊ मासाचा त्रास सहन करुन ती बाळाला जम्न देते तेव्हा आज आयुष्यातील सर्वात चांगला क्षण असे भाव तिच्या चेह—यावर स्पष्ट दिसतात. खरेतर बाळंतपण म्हणजे आईचे दुसरे जीवन. अपार वेदना सहन करुनही ती दुस—या जीवाला जन्म देण्याचे धाडस दाखवते. इथेच स्त्री पुरुषांपेक्षा सरस ठरते. मातृत्व लादलेल असो की स्त्रीने सहज स्वीकारलेल, दोन्ही परिस्थितीत कष्ट तिलाच होतात. तरी आपला पोटचा गोळा सुखरुप असेल याचीच काळजी तिला जास्त असते.
आईविषयी ही वाक्य प्रत्येकाने वारंवार ऐकली असावी. नक्कीच ऐकली असतील, वाचली असतील. पण अनुभवली किती हे मात्र तपासून पहा. कारण आम्हाला आई आवडते आपण म्हणत असलो तरी, आपल्या आयुष्यात रमल्यावर हीच आई कधी नकोशी होते हे कळत नाही. कुणासाठी ती आॅप्शन असते तर काहींसाठी केवळ जग का म्हणेल म्हणून घरातील एक वस्तू. नाही अजिबात म्हणू नका. कारण आपल्या अपेक्षा वाढतात तसतशी आई दूर जाते. पत्रकारिता सॉरी बातमीदारी करता करता थोडीबहुत दुनियादार अनुभवता आली. या चार—पाच वर्षांमध्ये मला अनेकांना जवळून भेटण्याची संधी मिळाली. माझे फ्रेंड सर्कल असो की माझे सहकारी. अगदी ज्यांच्या मी मुलाखती घेतल्या त्यांच्या आई किंवा केवळ बातमीसाठी मी ज्यांना भेटले त्या आई. कधी मला त्या व्यक्ती म्हणून आवडतात तर कधी आई म्हणून अधिक भावतात. पण बरेचदा मला रागच जास्त आला आहे. पण त्याहीपूर्वी मराठीतल्या धडयामध्ये किशोरीताई आमोणकरांची आई मला आजही आठवते. आपल्या मुलांना शिस्तीचे धडे देणारी किशोरीताईंची आई करारी व स्वाभिमानी होती. माहेरी श्रीमंती असली तरी सासरी जे मिळाले त्यात काम भागवून माहेरच्यांशी जेवढयास तेवढे संबंध ठेवत त्यांना मदत मागायची नाही अशी त्यांची आई होती. खलबत्त्यात कांडताना मुसळीचा आवाजही व्हायला नको. अर्थात तुम्ही काम करताय हे काही सांगायची गरज नाही. उलट तुमच्या कामामुळे इतरांना त्रास व्हायला नको अशी साधी शिकवण देणारी ती आई त्या पाठातून मला भेटली. आता तो धडा नेमका कोणत्या वर्गात होता हे नक्की आठवत नाही. पण त्यांची ती स्वाभिमानी आई मात्र आत्ताच्या आईंमध्ये दिसत नाही. श्यामची आई या पुस्तकातील साने गुरुजींची आई आणि वीणा गव्हाणकरांच्या एक होता कार्व्हरमध्ये ’जॉर्ज कार्व्हर’ यांची आई. भिन्न परिस्थिती असूनही या दोन्ही आई आपल्या मुलांना मोठी करतात. त्यांच्या संघर्षातून पुढे आलेली त्यांची मुल जगासमोर आदर्श. शिवबांना घडवणारी जिजाबाई असो की, पोटची पोर नसूनही असंख्या लेकरांची, वंचितांची आई झालेली सावित्रीबाई फुले असो. स्त्री हे रुप मला कायमच आश्चर्यात टाकते. तेव्हा स्वत:ही स्त्री असल्याख अभिमान मलाही होतो. मला निरीक्षण करायची खूप सवय. हे वतीभवती मी सारखे टिपत असते. एकदा सिग्नलवर सहज लक्ष गेले तेव्हा विशीच्या आतली गर्भवती दिसली. तिच्या अंगावर एकदम साधी साडी होती. हातात पिशवी,छोटी पर्सत. तिच्याकडे पाहूनच लक्षात आले. ती खूप दूरुन पायी आली असावी. खरे ​तर तिच्या वयात मी मात्र मस्त कॉलेजमध्ये जायचे. पण ​ती मात्र त्याच वयात दुसरा जीव सांभाळत होती. तितक्यात आॅटो आला आणि​ ती निघून गेली. त्यावेळी खूप राग आला होता. केवढीशी ती पोर. एकटीच दवाखान्यात गेली असेल. आपले रिपोर्ट, औषधी तिने एकटीनेच घेतल्या असतील. घरच्या कामातून तर तिची सुटका नाही. आता इतकी दमून गेल्यावरही तिच्या हातात कुणी ग्लासभर पाणी तरी आणून देईल का. तिचा नवरा कुठे असेल. त्याने आत्ता तिच्यासोबत असायला हवे. फक्त मुल होण्याइतकीच तिची गरज आहे. डोक्याचा भार भुगा झाला होता. तेव्हा मी ज्यांना भेटायला जाणार होते तिथे मात्र परिस्थिती वेगळीच होती. ती व्यक्ती शहरातील नामांकित सीए. माझ्याशी बोलता बोलता त्या सीएबाईंची मुलगी दुपारचा क्लास आटोपून घरी आली होती. आल्या आल्या ​मुलीने सॅक फेकली आणि ती तिच्या रुममध्ये निघून गेली. त्यांनी लागलीच कामवाल्या मावशीला ज्युस बनवून तिच्या रुममध्ये पाठवायला सांगितला. मग मला हळूच म्हणाल्या,'' यंदा तिची बारावी. म्हणून ती टेन्शनमध्ये असते. मी पण यावर्षी जास्त काम करणार नाही. शेवटी शेवटी सुटयाच घेईल. यंदा तर सासू—सास-यांनाही सांगितले ​की यंदा आम्हीच गावाकडे येतो. उगीच तिला अभ्यासात त्रास नको.''  मी इतका वेळ एका उत्तम करिअर असणा-या स्त्रीचा आदर्श टिपत होते. एका तासांच्या भेटीदरम्यान त्या आई म्हणून कशी असतील या माझ्या विचारांना क्षणात तडा गेला होता. त्यांचे विचार कानावर पडताच माझा उत्साह क्षणार्धात मावळला. एकाच दिवशी या दोन्ही घटनांचा अर्थ लावण्याचा माझा प्रयत्न निरर्थक होता. पण मनाचे द्वंद काही थांबत नव्हते. नंतर विचार केला मला काय करायचे. शेवटी दोन्ही घटनेतील कुटुंब वेगळी आणि त्यांची लाईफस्टाईल पण. तरी एका सत्यापासून मी पळू शकत नाही. ते म्हणजे आजच्या आईला पण खूप बदलण्याची गरज आहे. खरे तर आज मदर्स डे. कदाचित माझे विचार कुणाला फारसे पटणार नाही. पण आजच्या आईमध्ये मला आईच दिसत नाही. मुलांना मॉलमध्ये घेऊन फिरणा-या, मुलांचे फाजील लाड पुरवणा-या आणि मुलांसमोर काय बोलावे आणि काय नाही याचे भान न बाळगणा—या आई पाहल्या की त्यांची कीव येते. मुलांना मॉलमध्ये नेणे अजिबात गैर नाही. पण मॉलची झगमगाट पाहताना नकळत त्यांचे बालपण आपण हिरावतो याचे दु:ख त्यांना का नसावे. मुलांमधली ती निरागसता हरवताना पाहल्यावर आजची आई पण हरवली हे अधोरेखित होते. एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये उच्चशिक्षित वकिलीणबाई आपल्या मुलीला '' बेटा तू आल शॉर्टपीस घालायला हवे होते '' असे सांगत होत्या. काही वेळाने त्याच बाई मुली तोकडे कपडे घालून आपल्यावर वाईट प्रसंग ओढवून घेतात असे सांगत होत्या. चांगल्या शिकलेल्या महिला मंडळामध्ये भेटतात तेव्हा त्यांच्या चर्चाही अशाच कोरडया असतात.'' का ग आज लवकर का चाललीस. काय करु सासू—सासरे घरी आहेत. चार दिवसांसाठी आले म्हणत महिना झाला. चल मी निघते '' अशी वाक्य कानावर पडतात तेव्हा त्यांच्या मानसिकतेची दया येते. या आई मुलांना काय संस्कार देत असाव्यात याची कल्पनाच करवत नाही. तगडी फी घेणा-या शाळांमध्ये मुलांना टाकले हे आम्ही खूप अभिमानाने सांगतो. त्या शाळांमधून ​कदाचित दर्जेदार शिक्षण मिळत असेलही. पण संस्कार घरातूनच मिळतात. म्हणूनच मला आजच्या आईंना वारंवार सांगावे वाटते की या ज्या तुम्ही आहात ते तुमचे रुप स्त्रीला अजिबात शोभत नाही. स्त्रीने शिकाव, स्त्रीने काम कराव, हसाव,बोलाव, काय हव ते कराव. मलाही स्वच्छंदी स्त्री आवडते. पण आपले कर्तव्य, आपली जबाबदारी मात्र वडिलांपेक्षाही मोठी आहे हे विसरु नये. मुल घडवणे हे अजिबात सोप काम नाही. आईपण ​ही देणगी आहे जी स्त्रिला मिळाली. मोठेपण जबाबदारीही सोबत आणातात. यापासून आम्ही पळ काढायला नको. तसच मुलांनाही सांगावे वाटते, आईला किंमत देणे शिका. ती सुखात सोबत नसेल. पण आपल दु:ख ती स्वत:अनुभवते. केवळ तिने हातात ताट आणून द्यायचे इतकेच तिचे काम नाही. ती आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे.तिला नाही म्हणताना तिच्या वेदना आपण समजून घेत नाही. पण तरी ती आपल्यालावर प्रेम करणेही सोडत नाही. आज मदर्स डे. अनेकांनी आईसाठी भेट घेतली असावी. हरकत नाही. प्रेम करणे व ते व्यक्त करणे दोन्ही पण महत्त्वाचे. पण त्याहीपेक्षा आई आपल्या जीवनात आहे आणि म्हणूनच जीवन सुंदर आहे हे तिला आपल्या वागण्यातून कळूू द्या. यापेक्षा अजून सुंदर भेट तिला आपण देवूच शकत नाही.

Best Reader's Review