आम्हा पेज थ्रीकरांना माणुसकी उरली नाही

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 06-05-2017 | 11:55:40 pm
  • 5 comments

आम्हा पेज थ्रीकरांना माणुसकी उरली नाही

पृथा वीर

' आदल्या रात्रीच्या पार्टीमध्ये मला अनेक सेलेब्रिटी चमचे भेटले. पण दुस-या दिवशी हे चमको विनोद खन्‍नांच्या अंत्यसंस्‍कारामध्ये फिरकले सुद्घा नाही. यापैकी अनेकांनी दिवंगत विनोद खन्‍नांसोबत काम केले होते. स्वतःला अभिनेता म्हणून घेणा-यांनी याबद्दल लाज बाळगायला हवी. माझ्याही अंत्यसंस्‍काराला ही मंडळी येणार नाही असे मी गृहीत धरतो.' ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांनी नव्या ‌अभिनेत्यांवर ट्वीटरवर आपला संताप व्यक्त करुन सिनेसृष्टीतील नव्या पिढीचे कान उपटले. ऋषी कपूर यांनी पुढे येऊन या झगमगत्या दुनियेची एक काळी बाजू सर्वांसमोर आणली. हे सिनेस्टार्स सर्वसामान्यांसाठी आयकॉन आहेत. पण वास्तविक जीवनात पेज थ्री कल्चरमध्ये रुळताना सगळे कसे संधीसाधू व कामापुरते मामा असतात हे पुन्हा पहायला मिळते. एक शुक्रवार येतो आणि हे मंडळी स्टार्स होतात. लाखो  फॅन अक्षरक्षः त्यांना फॉलो करतात. आजची पिढी तर सिनेमात दाखवलेले जीवन हीच वास्तविकता समजतात. म्हणूनच युवा पिढी केवळ फॅशनपुरती या स्टार्सला फॉलो करत नाही तर अगदी त्यांची लाईफस्टाईल जशीच्या तशी स्वीकारतात. सिनेमात पडदा फाडून व्हिलनला धाडधाड मारणारे, गरीबांसाठी लढा देणारे हीरो प्रत्यक्ष जीवनात मात्र व्हिलनचे पात्र जगतात. आपल्या सेलेब्रिटी स्टेटसचा फायदा घेणारी ही मंडळी स्वतःच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भरभरुन बोलतात. आपल्याच सिने कम्युनिटीतील लोकांच्या उतरत्या काळात त्यांना साफ विसरुन जातात. शुभ्र वस्त्र आणि काळा गॉगल घालून अंत्यसंस्‍कारांमध्येही आपण कसे चमकू याची काळजी घेताना आपले सेलेब्रिटी स्टेटस धोक्यात तर नाही याचीच काळजी त्यांना असते. पुन्हा इथेही मरणारा कोण व मरतेवेळी तो किती ‌प्रसिद्ध होता याचे गणित जुळल्यावरच जाण्याचा बेत ठरतो. सार्वजनिक ठिकाणी सभ्य ‌भासणारे सेलेब्रिटी कधी-कधी  माध्यमांवर आगपाखड करतात. सर्वसामान्यांना फालतू समजतात. हाणामारीपासून ते फॅनच्या थोबाडीत लगावणारे सेलेब्रिटी काही दिवस प्रसिद्धीपासून दूर होतात. संधी मिळताच पुन्हा प्रगटतात. सलमान खानच्या ड्रंक अॅँड ड्राइव्ह, ब्लॅकबक प्रकरणांनी सेलेब्रिटी स्टेटसची पोहोच काय असते हे दाखवून दिले. झोपलेल्या लोकांना झोपेतच चिरडणा-या स्टार्सचा चित्रपट जेव्हा शंभर कोटींच्या क्लबमध्ये पोचतो तेव्हा भारतीय मानसिकतेला कशाचाच फरक पडत नाही हे प्रकर्षाने जाणवते. विनोद खन्‍नांच्य मृत्युच्याच दिवशी बाहुबली चित्रपटाचा प्रिमियर शो रद्द करुन किमान काही जाणकारांनी परिस्थितीचे गांभीर्य जाणले. मात्र आपल्याच दुनियेत व्यस्‍त असलेले इतर सिनियर स्टार्स मात्र अंत्यसंस्‍काराला गेली नाही. भलेही प्रत्येक कलाकार आपल्या मेहनतीने पुढे येतो व नाव कमावतो. पण आम्ही ‌इतके खुजे झालो की, आमच्यात माणुसकी उरलीच नाही हा संदेश सेलेब्रिटींच्या वागण्यातून डोकावतो.  स्क्रीनवर रिअल लाईफ जगणारी कलाकार मंडळी प्रेक्षकांना खूप आवडतात. मात्र आपल्याच एका सहका-याच्या अंतिम दर्शनाला ते येत नसतील तर उपयोग तरी काय? पेज थ्री पार्टीजला गरजेपेक्षा जास्त प्रसिद्धी देणा-या सोशल मीडियावर याच पार्ट्यांचे व्हिडिओ पाहल्यावर अक्षरक्षः शिसारी येते. प्रत्यक्ष समोर आल्यावर आपणच बरे.  कलाकारांच्या याच वृत्‍तीपायी अनेक कलाकार या चमकले पण ते ‌कधी निखळून पडले याचा पत्‍ता स्वतः सिनेजगतालाही नाही. स्पर्धा, तणाव, नैराश्यातून आत्महत्‍या करणा-या नवोदित अभिनेत्री, सुपर मॉडेल्स यांनाही सिनेसृष्टी विसरली. ख-या प्रेमाची पूर्तताच होत नसल्याने सर्व काही आहे पण आपल माणूस नाही याची खंत अनेकदा सेलेब्रिटी बोलून दाखवतात. पण त्यासाठी प्रयत्न मात्र करत नाही. एकमेकांची सोबत बरेचदा प्रसिद्धीपुरती असते. म्हणूनच यांचे खरे- खोटे प्रत्येकाने आपल्या सोयीने तपासावे. आपल्या सिनेमावर, अफेअरवर भरभरुन बोलणा-या सेलेब्रिटींमध्ये काही जबाबदार व्यक्ती जरुर आहेत. पण एकूणच हे पेज थ्री कल्चर मात्र पुरते फसवे आणि दांभिक आहे. स्वयंसेवी संस्‍थांना भरभरुन डोनेशन देणाच्या नावाखाली अमाप प्रसिद्धी मिळवताना बडे स्टार्स माणुसकीला खिशात घालून मिरवतात. पण त्याहून चटका लावणारी गोष्ट असते ती म्हणजे हे स्टार्स एकमेकांना विसरतात. आयुष्यभर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून मिरवताना आपलाच एक साथीदर एकाकी जीवन जगतो, एकटा पडतो. मग फॅनच आपल्या आवडत्या कलाकारांचा शोध घेतात. विनोद खन्‍नांबाबतही असेच झाले. पण ते परत आले. राजकारण ते सिनेमा अशी दोन्हीमध्ये सक्रीय झाले. पण ते हॉस्पीटलमध्ये अॅडमिड झालेले फोटो व्हायरल झाले तेव्हा अवघा देश हळहळला. पण  स्टार्सकडून फार प्रतिक्रिया आल्या नाहीत. इतक्या त्यांच्य भावना शुष्क झाल्या. स्टारडम बाजूला ठेऊन आपणही एक माणूस आहोत ही भावनाच बहुधा ते विसरले असावे. मग असे शेकडो विनोद खन्‍ना गेले तरी काय फरक पडतो. आपल्या लाडक्या अभिनेत्याला खांदा द्यायला फॅन न बोलवता येतील. पण त्यांच्या बरोबर काम केलेले सिनेस्टार मात्र नक्‍कीच एखाद्या पार्टीमध्ये सापडतील.

Best Reader's Review