Breaking News

निर्मला गंगा मी पाहिली...

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 09-02-2017 | 01:31:55 am
  • 5 comments

वैश्विक स्वाध्याय कार्याचे प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले
यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे 30 जानेवारी रोजी देहावसान झाले.
निर्मलाताईंप्रती आदरांजली म्हणून त्यांच्या जीवन कार्यावर लेख.

--------------------

निर्मला गंगा मी पाहिली...

 

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादा) यांच्या धर्मपत्नी पूजनीय निर्मलाताई यांचे 30 जानेवारी रोजी देहावसान झालं. दैवी स्वाध्याय कार्यात दादांना मोलाची साथ दिली. या माऊलीने धनश्री दीदींसारखं नेतृत्वकुशल रत्न घडवलं. वैश्विक स्वाध्याय परिवारासाठी निर्मलाताई संस्कारदाताआईबनल्या. स्वाध्याय परिवारात त्यांनाताईम्हणून संबोधतात. गंगेप्रमाणे प्रेमळ, निर्मळ आणि पवित्र जीवन ताई जगल्या.   

भारतीय संस्कृतीत लग्न हे सांस्कृतिक कार्याचा एक भाग मानलं आहे. धर्माच्या कामात पत्नीची आवश्यकता असल्याने धर्मपत्नी असा शब्दप्रचार देखील रुढ आहे. वैश्विक संसाराच्या कल्याणाचा विचार करणार्‍या ऋषी आणि संतांनी स्वतःचा संसार देखील थाटला. त्यांनी आदर्श कौटुंबिक जीवनातून इतरांना मार्गदर्शन केलं. वशिष्ट-अरुंधती, एकनाथ-गिरिजा ही यापैकीच काही आदर्श उदाहरणे आहेत. पूजनीय पांडुरंगशास्त्री आणि निर्मलाताई (दादा-ताई) यांचे नाव देखील यात जोडलं गेलं आहे. मार्च 1944 मध्ये रोहे (जि.रायगड) येथील दत्त मंदिरात या दोघांचा विवाह झाला. संस्कृतीचा जीर्णोद्धार आणि दैवी विचार प्रत्येक माणसापर्यंत घेऊन जाणं हेच ध्येय घेवून दादा अजीवन कार्य करत राहिले. ताईंनी देखील दादांच्या या दैवी स्वाध्याय कार्यात आपलं सर्वस्व समर्पण केलं.

ताईंचे जन्मवर्ष शुभयोगावर

रत्नागिरी जिल्हातील गावखडी गावात 3 ऑगस्ट 1926 रोजी निर्मलाताईंचा जन्म झाला. त्यांचे वडील भाऊसाहेब सिधये हे गिरगावातच (मुंबई) स्थायिक झाले होते. ताईंचा जन्मदिन हा देखील एक शुभयोग म्हणावा लागेल. दादांचे वडील तीर्थरूप वैजीनाथशास्त्री आठवले यांनी 1926 मध्ये श्रीमद्भवगद्गीता पाठशाळेची स्थापना केली. हीच पाठशाळा आज लाखो स्वाध्यायींसाठी विचारतीर्थ आहे. पाठशाळेची स्थापना आणि ताईंचे जन्मवर्ष हे एकाच शुभ योगावर आले. ताईंना आपला जन्मदिन स्वतंत्रपणे साजरा करायला आवडत नव्हते. दादांचा जन्मदिन तुम्ही ‘मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा करता! त्यातच माझा जन्मदिन साजरा झाला, असे त्या स्वाध्यायींना सांगत. तरी देखील कृतज्ञता म्हणून स्वाध्यायी 3 ऑगस्ट हा ताईंचा जन्मदिन ‘वर्षा मिलन’ म्हणून साजरा करतात. ताईंना वैयक्तीक आणि घराची स्वच्छता राखयला आवडत. यासाठी ‘जिथल्या तिथे आणि जेव्हाचे तेव्हा’ हे महत्त्वाचे सूत्र त्या पाळायच्या. ताई सांगत की, “आपलं स्वयंपाकघर अन्नपूर्णा मातेचं बसण्याचं ठिकाणं आहे. आपण जसं एखाद्या अस्वच्छ ठिकाणी बसत नाही, तसं अन्नपूर्णा मातेसाठी आपलं स्वयंपाकघर स्वच्छ असायला हवं!” यामुळं दरवर्षी वर्षामिलनाच्या निमित्ताने लाखो स्वाध्यायी कुटुंब घराची स्वच्छता करतात. विशेष म्हणजे समजपूर्वक या कृतीचं नियमित पालनं देखील केलं जातं. 

इदं ममजीवन

स्वाध्याय कार्याच्या निमित्ताने दादाचं नेहमी गावोगावी फिरण असायचं. अशावेळी आठवले कुटुंबाची आणि स्वाध्याय परिवाराची जबाबदारी ताईंनी समर्थपणे सांभाळली. आठवले कुटुंबातील सदस्य, नातलग यांची त्यांनी सर्वोतोपरी काळजी घेतली. प्रत्येक स्वाध्यायीला देखील मातृ हृदयाने त्यांनी जपलं. तत्त्वज्ञान विद्यापिठात शिकणार्‍या विद्यार्थ्यांवर संस्काराचं मातृसिंचन त्यांनी केलं. स्वतःच प्रभावी असं व्यक्तीमत्व असूनही त्यांनी दादांमध्ये सर्वस्व समर्पित केलं. संसारात मन, बुद्धि आणि अहंकाराचं समर्पण किती आवश्यक आहे, हे ताईंचं जीवन बघितल्यावर लक्षात येतं. संसारात कोणत्याही भौतिक गोष्टींची मागणी न करता ‘इदं न मम’ जीवनं त्या जगल्या. दादांसाठी आणि स्वाध्याय कार्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. आज देशविदेशात असलेला लाखोंचा स्वाध्याय परिवार म्हणजे दादा-ताईंच्या दाम्पत्य जीवनातील तपाचं फळ आहे.

कृतियुक्त जीवनाचा पाठ

पूजनीय ताईंनी आपल्या जीवनकार्यातून कृतियुक्त जीवनाचा पाठ शिकवला. स्वाध्याय कार्याच्या बाबतीत निर्णय घेताना कृतिशिलांना ताई वेळावेळी मार्गदर्शन करत. वर्ष 1992 मध्ये ‘मनुष्य गौरव दिना’च्या निमित्ताने परिवाराला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, “दैवी स्वाध्याय कार्य दादाचं आहे, परंतू तुम्ही सर्वजण आपलं मानून करत आहात. या भावनेतून मी खूप आनंदी आहे.” दादा आणि ताईंनी मिळून आज लाखो स्वाध्यायींचा संसार सुखाचा केला आहे. ताईंनी धनश्री दीदींवर केलेल्या संस्काराचं प्रतिबिंब स्वाध्याय कार्याच्या यशस्वी वाटचलीतून आज प्रगट होत आहे. आदर्श धर्मपत्नी आणि आदर्श मातेचं उदाहरण म्हणजे ताई आहेत. निर्मलाताई आज देहरूपातून विचार आणि कार्य रूपात विलीन झाल्या आहेत. त्यांनी दिलेली प्रेम आणि विचारांची शिदोरी आयुष्याला पुरणारी आहे.

निर्मला गंगा मी पाहिली।

संताच्या संसारी शक्ती बनून राहिली॥ 

-------------------------------------------

- राहुल कुलकर्णी, गंगापूर

   मो.नं.9423689812

Best Reader's Review