Breaking News

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; राज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढणार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Mon 02-12-2019 | 12:03:23 am
  • 5 comments

राज्याची आर्थिक श्वेतपत्रिका काढणार

उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

मुंबई: राज्याची नेमकी आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. विधिमंडळातील पत्रकार कक्षातील अनौपचारिक गप्पांदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे. ही एकप्रकारची आर्थिक श्वेतपत्रिका असेल, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. 
 
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. मी सध्या राज्यात सुरु असलेल्या विकासकामांबाबत माहिती मागवली आहे. हे प्रकल्प कधी सुरु झाले आणि कधी पूर्ण होणार तसेच सध्या त्यांची परिस्थिती काय आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. जेणेकरून विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवता येईल. यामध्ये बुलेट ट्रेनसारख्या प्रकल्पांचाही आढावा घेण्यात येईल. मात्र, केवळ आकसापोटी कोणताही प्रकल्प रद्द करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. गेल्या 5 वर्षात आम्ही सत्तेत होतो. पण 5 वर्षात विकासकामं कधी, कुठे कशी झाली किती खर्च झाला याबाबत मी माहीती मागवली आहे. त्या सगळ्यांची श्वेतपत्रिका काढणार आहोत.काही विकासकामं ज्यांची तातडीने आवश्यकता नाही ते पाहत आहोत.काही विकासकामं करणं गरजेचं आहे पण ती कामं रखडलेली आहे तेही पाहणार आहोत. हे फक्तं माझं सरकार नाही...तर तूमचं सर्वांचं सरकार आहे. सर्वसामान्यांचं हे सरकार आहे.बुलेट ट्रेन चा आढावा घेऊ, बुलेट ट्रेन अजूनही रद्द केली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी खातेवाटपाबाबतही भाष्य केले. सुरुवातीला कामे मार्गी लावण्यासाठी शपथविधी झालेल्या सात मंत्र्यांमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप केले जाईल. तर अंतिम खातेवाटपाचा निर्णय तिन्ही पक्ष मिळून घेतील, असे उद्धव यांनी सांगितले.

पंतप्रधांनाची भेट घेणारः मुख्यमंत्री

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याप्रकरणी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. विरोधकांनीही पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मागावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

Best Reader's Review