Breaking News

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात नवीन उद्योजक तयार करण्यासाठी प्रयत्नशील : संभाजी पाटील-निलंगेकर . स्टार्ट अप सप्ताह-२०१८ चा शुभारंभ

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 26-04-2018 | 12:57:56 am
  • 5 comments

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात नवीन उद्योजक

तयार करण्यासाठी प्रयत्नशील : संभाजी पाटील-निलंगेकर

स्टार्ट अप सप्ताह-२०१८ चा शुभारंभ
मुंबई, दि. २५ : स्टार्ट अपच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान तसेच नवनवीन संकल्पनांवर आधारित नवीन उद्योजक तयार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही नवीन उद्योजक तयार व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असे कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज येथे सांगितले.
 
महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टार्ट अप सप्ताह-2018 चे उद्‌घाटन कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
 
श्री. पाटील-निलंगेकर म्हणाले, या सप्ताहाअंतर्गत नाविन्यपूर्ण उत्पादन व सेवा यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येईल. स्टार्ट अपअंतर्गत शिक्षण, कौशल्य, आरोग्य, शेती, स्वच्छ ऊर्जा, पर्यावरण, पाणी आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन, स्मार्ट पायाभूत सुविधा, दळणवळण, आर्थिक, सायबर सुरक्षा या क्षेत्राचा स्टार्ट अप योजनेत समावेश आहे. या क्षेत्रातील नवीन उद्योजकांनी आपले अर्ज या सप्ताहात 25 ते 31 मे पर्यंत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडे पाठवावयाचे आहेत. यामधील 100 व्यवस्थापक/उद्योजक यांची निवड करुन त्यांना निवड समितीपुढे सादरीकरण करण्याची संधी देण्यात येणार आहे. यामधून प्रत्येक क्षेत्रातील तीन अशा एकूण 24 नवीन उद्योजकांची निवड करुन त्यांना 15 लाखापर्यंतच्या कामाचे कार्यादेश महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर नवीन उद्योजकांना (स्टार्ट अप) शासकीय यंत्रणेशी संपर्क व सहयोग पुढील 12 महिन्यासाठी देण्यात येणार आहे. परदेशात व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या वरील 24 उद्योजकांव्यतिरिक्त पाच ते दहा नवीन उद्योजकांना परदेशात बाजारपेठ विकसित करण्यासाठी 15 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 
महाराष्ट्र राज्याने तयार केलेले स्टार्ट अप धोरण या पुस्तिकेचे प्रकाशन श्री. पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि टाटा ट्रस्ट फाउंडेशन यांच्यामध्ये स्टार्ट अप संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.
 
 
 
स्टार्ट अपचे हे धोरण इतर राज्यांनी स्टार्ट अपसाठी केलेल्या धोरणापेक्षा व्यापक व उपयुक्त ठरणार आहे. नवीन उद्योजकांसाठी (स्टार्ट अप) शासनाबरोबर काम करण्याची थेट संधी मिळणार आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातून नवीन उद्योजक तयार होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून पाच नवीन उद्योजक निवडून त्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नवीन उद्योजक तयार करण्याबरोबरच रोजगार व स्वयंरोजगार वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे श्री. पाटील-निलंगेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक ई.रविंद्रन यांनी केले.
 
यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई.रविंद्रन, व्हीएसटीएफच्या संचालिका श्वेता शालीन, टाटा ट्रस्ट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कुमार आदी उपस्थित होते.

Best Reader's Review