Breaking News

वडिलांच्या स्वप्नांना मिळाले मुलीच्या यशाचे बळ

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 25-02-2018 | 12:43:26 am
  • 5 comments

वडिलांच्या स्वप्नांना मिळाले मुलीच्या यशाचे बळ

स्पर्धा पर‍िक्षेच्या विश्वात जेव्हा मी माझी तुलना 10 लाख विद्यार्थ्यांशी केली, तेव्हा मला मी कुठेच दिसली नाही. परंतु मी माझी तुलना एकटीशीच केली तेव्हा मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात दुसरी होते. कारण स्पर्धा ही स्वत:शीच असते त्या 10 लाख विद्यार्थ्यांशी नाही. हे भारावून सोडणारे शब्द आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक परीक्षेत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून राज्यात दुसऱ्यास्थानी आलेल्या नम्रता वाघ हीचे.

कौटुबिंक जबाबदाऱ्यांमुळे वडिल राजकुमार वाघ यांचे शासकीय सेवेचे स्वप्न हे अपूर्ण राहिले होते. आपलं अपूर्ण राहिलेले स्वप्न हे आपल्या मुलांच्या माध्यमातून पूर्ण करायचे असा विडाच वाघ यांनी उचलला होता. त्यांनी उराशी बाळगलेलं स्वप्न तब्बल 20 वर्षांनतंर सत्यात उतरवून दाखविण्याचे काम त्यांची मुलगी नम्रताने केलंय. वडिलांना महिन्याकाठी मिळणारा तुटपुंजा पगार, घरात असणाऱ्या अपुऱ्या सोयी सुविधा, पुस्तके यांचे भांडवल न करता रात्री आठ ते पहाटे तीनपर्यंत जागून अभ्यास करणारी नम्रता जवळपास सहा महिन्यांत एमपीएससीच्या सहा पूर्व तर एक मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. घरात सरकारी नोकरी तर नाहीच परंतु मार्गदर्शन करणारे देखील कोणी नव्हते. त्यामुळे आपल्या मुला-मुलींना अभ्यासपूर्ण शांत वातावरण मिळावे म्हणून मुद्दामहून वडील राजकुमार यांनी एका खासगी वसतिगृहात रेक्टरची नोकरी पत्करली. मुलीने देखील कुठल्या बाबींसाठी हट्ट न करता अभ्यासाला प्राधान्य दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल महिनाभरापूर्वी लागला, तेव्हा औरंगाबाद येथील एन-6 परिसरातील सुलोचना वसतिगृहाच्या आवारात लोखंडी पत्र्याच्या दोन खोल्यात राहणाऱ्या वाघ परिवाराला आकाशही ठेंगणे वाटलं होतं. आपल्या मुलीची दुय्यम निरीक्षकपदी निवड झाली या आनंदाने आई-वडिलांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून राजकुमार आणि त्यांची पत्नी संगीता या दोघांनी पोटाला चिमटा काढून स्वयंपाक बंद राहिला तरी चालेल असा पवित्रा घेत मिळेल ते काम केलं. त्यांच्या या अपार त्यागाचे अन् मेहनतीचे फळ नम्रता हिने मिळविलेल्या यशाने त्यांच्या पदरात पडलंय.

नम्रता हिचे प्राथमिक शिक्षण सिडकोतील विनायकराव पाटील विद्यालयात झाले. तर दहावी वेणुताई चव्हाण प्रशाला, तर 12 वी सरस्वती भुवन महाविद्यालयातून झाली. नंतर डी.एड्. करून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बी.ए. पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. डी.एड्. करून देखील सरकारी नोकरी मिळाली नाही म्हणून तिने 2015-16 एक वर्ष स्पर्धा परीक्षेचा क्लास लावला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला तेव्हा एमपीएससी काय असते हे समजलं. (अगर मै आपको motivate करूंगी या आप किसी और से motivate होंगे तो आप इसमे कुछ वक्त निकाल पाओगे, लेकीन अगर आप खुद motivate होंगे तो उसमे पुरी जिंदगी निकाल दोगे !) आयुष्य हे प्रतिध्वनीसारखे असते. जे आपण त्याला देतो तेच आपल्याला परत मिळते. स्वत:वर जास्त बंधने लादून अभ्यास होत नाही. त्यामुळे आपल्याला जे करायला आवडते तेच करत अभ्यास करावा. असलेल्या परिस्थितीवर रडत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग काढावा असा यशाचा मंत्रही नम्रताने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.

अशी केली तयारी 

महागडी पुस्तके, वाचनालय लावणे हे घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे शक्य नव्हते. त्यामुळे स्वत:च अभ्यास करण्याला प्राधान्य दिले. जुन्या 5 वर्षापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचे वाचन करून नेमके आयोगाला काय उत्तर अपेक्षित आहे हे कळाले. जुने पेपर सोडविताना त्यातील चुकलेल्या प्रश्नांची कारणमीमांसा केली. बरेच प्रश्न हे बुचकळ्यात टाकणारे असतात. यामुळे या प्रश्नांकडे विशेष लक्ष दिले. इयता 4 ते बारावी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास केला. त्यामुळेच वर्षभरात एमपीएससीच्या सहा पूर्व परीक्षांमध्ये तर पहिल्याच प्रयत्नात राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षकपदी अनुसूचित जाती जमाती महिला प्रवर्गातून राज्यातून दुसरे स्थान मिळविणे शक्य झाल्याचे तिने सांगितले.

स्मार्ट फोनचा केला योग्य वापर

स्मार्ट फोनचा योग्य वापर करून त्यातूनही काही नोटस् काढल्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मैत्रिणींचा एक व्हॉटसॲप ग्रुप तयार केला. त्यावर स्पर्धा परीक्षासाठी लागणाऱ्या माहितीची त्यांनी देवाण-घेवाण सुरू केली आहे.

असा करा अभ्यास 
  • अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. शक्यतो रात्रीचा वेळ अभ्यासासाठी निवडा. रात्री 9 ते सकाळी 4 ही वेळ अभ्यासाठी उत्तम असते.
  • मागील पाच वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे वाचन करावे.
  • चौथी ते बारावी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करावा.
  • स्मार्टफोनचा योग्य वापर करावा.
  • रोज जास्तीत जास्त दैनिकांचे वाचन करावे. सामान्य ज्ञानवाढीसाठी परिक्रमा मासिकाचे वाचन करावे.

- रमेश भोसले,
संहिता लेखक,
विभागीय माहिती कार्यालय, औरंगाबाद

Best Reader's Review