Breaking News

पंतप्रधान मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातुन संजीवनी जाधव यांनी साधला स्वयंरोजगार

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sun 25-02-2018 | 12:37:12 am
  • 5 comments

पंतप्रधान मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातुन 

संजीवनी जाधव यांनी साधला स्वयंरोजगार

आयुर्वेद तसेच दैनंदिन जीवनामध्ये आवळा या फळाचे असंख्य उपयोग आहेत.  पहिली चव घेताच अतिशय तुरट लागणारा आवळा काही क्षणात जिभेवर अगदी अमृताचा गोडवा आणतो. पंतप्रधान मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातुन कर्ज घेऊन आवळयाच्या व्यवसायातून संजीवनी जाधव यांच्या जीवनातसुद्धा अमुलाग्र बदल झाला आहे. केवळ 9 वीपर्यंत शिक्षण घेतलेल्या असणाऱ्या संजीवनी जाधव यांनी आवळा उद्योगाच्या माध्यमातून एक यशस्वी उद्योजिका होऊन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 

लहान वयातच संजीवनी जाधव यांचे लग्न अशोक जाधव यांच्यासोबत झाले.  सासरची परिस्थिती हालाकीची होती.  अशोक जाधव हेसुद्धा कामगार म्हणून काम करत असल्याने हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागत होते.   लग्नानंतर संजीवनी जाधव यांनी दोन मुली एक मुलगा अशी अपत्ये झाली.  दोन वेळच्या खाण्याची ज्या ठिकाणी भ्रांत होती अशा परिस्थितीमध्ये या मुलांचे संगोपन करावे तरी कसे.  तसेच या मुलांना उच्चशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर कसे उभे करता येईल हा प्रश्न सातत्याने संजीवनी जाधव यांना स्वस्थ बसु देत नव्हता.  संजीवनी जाधव यांच्या अंगी जिद्द आणि मेहनत करण्याची तयारी होती.  त्यातच त्यांना बचतगटाची संकल्पना सुचली.  शेजारी आठ ते दहा महिलांनी त्यांनी एकत्रित करुन बचतगटाची सुरुवात केली.  जालना तालुक्यात असलेल्या खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्रामध्ये आवळयावर प्रक्रिया करणाऱ्या प्रशिक्षणाची जाहिरात त्यांनी वृत्तपत्रातून वाचली आणि त्यांच्या यशस्वी उद्योजिकेच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. 

कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातुन आवळयावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचे पाच दिवसांचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी व्यवसाय सुरु केला.  केवळ दहा हजार रुपयांपासून सुरु केलेल्या व्यवसाय अल्पावधीतच भरभराटीस आला.  तयार केलेल्या मालाला बाजारपेठेतुन मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली.  वाढत्या मागणीप्रमाणे माल तयार करुन देण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता होती व त्यासाठी पैशांची चणचण भासु लागली.  पण पंतप्रधान मुद्रा बॅक योजनेच्या माध्यमातुन कर्ज घेऊन उद्योगासह कुटूंबाच्या भरभराटीला सुरुवात झाली.

मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातुन व्यवसायास भरभराटी

    मागणीप्रमाणे बाजारपेठेमध्ये माल तयार करुन देण्यासाठी कच्चा माल विकत घेण्यासाठी व प्रक्रिया करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा बँक योजनेने साथ दिली.  केंद्र शासनाने बेरोजगार व उद्योग करु इच्छिणाऱ्यांसाठी विनातारण कर्ज देणारी योजना सुरु केल्याचे कळाले.  जालना येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत पंतप्रधान मुद्रा बँक योजनेच्या कर्जाविषयी चौकशी केली असता बँकेचे व्यवस्थापक श्री कुतवळ यांनी या महिलेची धडपड व जिद्द व व्यवसाय करण्याची चिकाटी पाहुन 4 लाख रुपयांचे कर्ज मंजुर केले आणि या पैशांच्या माध्यमातुन 10 हजार रुपयांपासुन सुरु केलेला व्यवसायाची वार्षिक उलाढाल 20 ते 25 लाख रुपयांपर्यंत गेली आहे.

मुद्रा बँक योजनेच्या कर्जामुळे मुलींना उच्च शिक्षण

    पंतप्रधानमुद्रा बँक योजनेच्या माध्यमातुन मिळालेल्या कर्जामुळे आवळा प्रक्रिया उद्योग यशस्वीरित्या करता आला.  या उद्योगाच्या माध्यमातुन मिळालेल्या पैशामधुन माझ्या दोन मुलींना उच्च शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभा करता आले आहे.  आज माझ्या दोनही मुली अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.  जर मुद्रा बँक योजनेने आधार दिला नसता तर कदाचित मुलींना शिक्षण देता आले नसते. मुद्रा बँक योजनेच्या कर्जामुळेच मी माझ्या कुटूंबाचा आर्थिक स्तर उंचावुन समाजामध्ये सन्मानाने जगत आहे.

आवळयाच्या विविध पदार्थाला राज्यासह परदेशात मागणी

    आवळयावर प्रक्रिया करुन वेगवेगळे पदार्थ तयार करण्यात येतात.  यामध्ये आवळा कँडी, आवळा सुपारी, आवळयाचे लोणच, आवळयाचा मुरब्बा, आवळा पावडर, आवळयाचा चहा, मोरावळा आदी उत्पादने तयार करण्यात येतात.  या उत्पादनाला जालनाच्या बाजारपेठेसह औरंगाबाद, बीड, परभणी, मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी असुन कोरियामध्ये झालेल्या प्रदशनामध्येही या उत्पादनांचा समावेश करण्यात आला होता.

       उद्योग, व्यवसाय करण्यासाठी शिक्षणच हवे असे नाही. अंगी जिद्द, मेहनत आणि काहीतरी करुन दाखविण्याची जिद्द असेल तर कुठल्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो. तरुण, तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय उभा करावा. तसेच महिलांनीही आता पुढे येऊन विविध व्यवसाय करण्याची गरज आहे, असा संजीवनी यांचा आग्रह आहे.  उद्योगाच्या माध्यमातून आपला आर्थिक स्तर उंचावण्याबरोबरच बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचे काम या माध्यमातून करावे,असा त्यांचा दृष्टीकोन आहे.                                                                                    एस.के. बावस्कर,जिल्हा माहिती अधिकारी,जालना.

 

 

Best Reader's Review