Breaking News

लोकनायक उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 28-11-2019 | 12:13:39 am
  • 5 comments

लोकनायक

उद्धव बाळासाहेब ठाकरे

सामाजिक कामांच्या माध्यमातून शिवसेनेला `गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड` मध्ये पोहोचविण्याचे काम केले ते उद्धव ठाकरे यांनीच. त्यामुळेच शिवसेनाप्रमुख जसे `लोकमान्य` बनले तसेच उद्धव ठाकरे हेही आपल्या कामातून विश्वविक्रमी `लोकनायक` बनले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविषयी पक्षाबाहेर अनेक मतमतांतरे आहेत. शिवसेनाप्रमुखांचा वारसा ते समर्थपणे चालवू शकतील का, असाही प्रश्न यापूर्वी अनेकदा उपस्थित करण्यात आला होता. बाळासाहेबांचा आक्रमक स्वभाव, त्यांचे आक्रमक भाषण करून विरोधकांना नामोहरम करून टाकण्याची शैली, या गोष्टी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाहीत असे मानणारा एक वर्ग आहे. स्वत: उद्धव ठाकरे हेही आपण शिवसेनाप्रमुखांसारखे भाषण करू शकत नाही हे मान्य करतात. बाळासाहेबांसारखे व्यक्तीमत्व हे शतकातून एखाद्यावेळीच जन्माला येते त्यामुळे त्यांच्यासारखे दुसरे कोणी असूच शकत नाही, असे स्पष्टपणे ते सांगतात. मग उद्धव ठाकरे यांच्यामध्ये असे नेमके असे काय आहे की त्यांनाही सर्व सामान्य शिवसैनिक आपला नेता मानतो. शिवसेनाप्रमुखांसारखा करिष्मा नसूनही त्यांच्यावर सर्वांचा विश्वास का आहे, सौम्य व्यक्तीमत्व असूनही त्यांच्याविषयी शिवसेनेत आदरयुक्त भीती का निर्माण झाली आहे… या आणि अशासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे खरे तर खूप सोपी आहेत.

सौम्य असले तरी ते आपल्या भूमिकेवर अत्यंत ठाम असतात. दिलेल्या शब्दाला ते जागतात. उगाच नेत्याची झुल पांघरून न बसता अथवा बडेजाव न करता थेट कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात. विशेष म्हणजे खोटेपणाची व चमचेगिरीची चिड असलेले उद्धव ठाकरे हे जनसामान्यांची कामे करण्याला प्राधान्य देतात. सत्ता हे केवळ साध्य नसून लोकांची कामे करण्याचे साधन आहे असे उद्धव यांचे मत आहे. त्यामुळेच बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेल्या शिवसैनिकांनाही ते आपलेसे वाटतात. राजकारणापेक्षा समाजकारणात रमणारे असे त्यांचे व्यक्तीमत्व आहे.

१९९७ पासून महापालिका निवडणूक पाहत  आहेत .मुंबई महापालिकेची सत्ता त्यांच्या नेतृत्वाखाली मिळाल्यानंतर पावसाळ्यात मुंबईतील खड्डे हा चर्चेचा विषय बनला तेव्हा ते स्वतः खड्डे बुजविण्याच्या कामात सक्रिय झाले. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो की मुंबईच्या आरोग्याच्या समस्या असो त्या सोडविण्यासाठी जीवाचे रान करण्याची त्यांची तयारी असते. यंदाही पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडले तेव्हा रात्री तीन तीन वाजेपर्यंत खड्डे बुजविण्याच्या कामावर त्यांनी जातीने लक्ष ठेवले होते. मलेरियाची समस्या उद्भवताच पालिका प्रशासनाच्या बैठका घेतल्या. स्वत: सर्व रुग्णालयांमध्ये फिरून उपचाराची व्यवस्था तपासून पाहिली. शिवसेनेच्यावतीने मलेरिया तपासणी व उपचार केंद्रे सुरू केली. शिवसेनेच्यावतीने ३० लाख रुपयांच्या औषधांचे वाटप केले. मुंबईची त्यातही उपनगरातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी योजना आखल्या. यातून आगामी काळात बोरिवली येथे भगवती, कांदिवली येथे शताब्दी, विलेपार्ले येथील कुपर तसेच जोगेश्वरी येथे रुग्णालये उभी राहिली आहेत वा उभी रहात आहेत. ही रुग्णालये उपनगरातील ६३ लाख लोकांसाठी काळाची गरज आहे.

लोकांसाठी आणि विकासासाठी सत्ता राबविण्याचे स्वप्न पाहणारे व ते प्रत्यक्षात आणण्यासाठी राबणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आगळे वेगळे म्हणावे लागेल.

२५ एप्रिल २०१० ला एनएसई संकुलात `रक्तदानाचा महायज्ञ` आयोजित करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी एका अलौकिक सामाजिक कार्याचे शिवधनुष्य उचलले आणि पाहता पाहता या महायज्ञाने शिवसेनेची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रखर सामाजिक बांधिलकी असल्यामुळेच अशक्य वाटणार हे विश्वविक्रमी सामाजिक कार्य सहज होऊन गेले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सामाजिक कामाविषयी दृढ निष्ठा व विचारांची बैठक असल्यामुळेच रक्तदानाचा महायज्ञ होऊ शकला.

आजच्या राजकीय प्रवासात प्रसारमाध्यमांच्या मदतीने सहज मोठे होता येणे शक्य असतानाही ही झटपट मोठे होण्याची वाट उद्धव यांनी आजपर्यंतच्या राजकीय वाटचालीत चोखाळली नाही. ठाकरे घराण्यातील पूर्वीसुरीचे सामाजिक कार्य आणि शिवसेनाप्रमुखांच्या सामाजिक बांधिलकीचा वारसा घेऊन राजकारणात प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांनी कामातून लोकांना जिंकण्याचा मार्ग स्वीकारला आहे. ही वाटचाल सोपी नाही. अत्यंत खडतर वाटचाल असून या वाटेवर श्रेयापेक्षा टीकेचे धनीच जास्तवेळा व्हावे लागते.

शिवसेनेच्या कामकाजात लक्ष घालण्यास उद्धव ठाकरे यांनी ज्या सुमारास लक्ष घातले त्यावेळी परिस्थिती लक्षात घेऊन तळापासून पक्षाची बांधणी करण्यास सुरुवात केली. गटप्रमुखांच्या नेमणुकांमध्ये त्यांनी लक्ष घातले. पुढे उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख पदांच्या नियुक्त्या सुरु झाल्या तेव्हा प्रस्थापितांनी आपल्या विभागांना हात लागणार नाही याची काळजी घेण्यास सुरुवात केली.

मुरब्बी राजकारण्याप्रमाणे उद्धव यांनी  संघटनाबांधणीकडे लक्ष देत होते. नगरसेवकांपासून आमदारांपर्यंताची उमेदवारी ही संघटनेकडून म्हणजेच शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांच्या माध्यमातूनच ठरेल अशी भूमिका घेत संघटनेला व पदाधिकाऱ्यांना महत्व दिले. युति सरकारच्या राजवटीतच उद्धव यांनी जवळपास संघटनात्मक बांधणी पूर्ण केली. शिवसेनाप्रमुख व शिवसैनिक मोठा असल्याचे उद्धव यांनी कृतितून दाखवून दिले .

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-ठाणे महापालिकेच्या निवडणुकित विजय मिळाला आणि त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. कोणाच्याही टीकेला प्रत्युत्तर न देता उद्धव यांनी संघटना बांधणीवर आणि राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून काम सुरूच ठेवले. निवडणुकीनिमित्त उद्धव यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ग्रामीण भागातील अनेक विषय त्यांनी लावून धरले. प्रसंगी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी स्वतः काढलेल्या  छायाचित्रांचे   फोटोग्राफ चे  प्रदर्शन भरवून तय विक्रीतून आलेली सुमारे 10लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांसाठी दिली आणि एक वेगळा संवेदनशील राजकारणी असल्याच दाखवून दिले . 

उद्धव ठाकरे आज शिवसैनिकांच्या गळ्यातले ताईत आणि महाराष्ट्रातील सर्वसमान्यांचे लोकनायक झाले ते त्यांच्या याच संवेदनशील स्वभावामुळे आणि धोरणात्मक संयमी राजकीय पावुलखुणांमुळे !!!

हर्षल प्रधान 

जनसंपर्क प्रमूख 

शिवसेना पक्षप्रमुख

Best Reader's Review