पारसी गारा एम्ब्रॉयडरीला जिवंत ठेवणा-या झिनोबिया डावर

  • Post By आज दिनांक वेब टीम | Sat 17-02-2018 | 12:06:16 am
  • 5 comments

पारसी गारा एम्ब्रॉयडरीला जिवंत

ठेवणा-या झिनोबिया डावर

कला ही अंगीभूत असणं, ती शास्त्रोक्त पद्धतीने शिकणं व ती टिकावी म्हणून प्रयत्न करणं असं समीकरण चफकल लागू पडावं अशा मुंबई येथील परळ भागातील उद्योजिका व कलासाधक झिनोबिया डावर. पारसी गारा एम्ब्रॉयडरीला जीवंत ठेवण्यासाठी व ही कला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्या प्रयत्नरत आहेत. दिल्लीचे हृदय अशी ओळख असणाऱ्‍या कॅनॉट प्लेस भागातील बाबा खडकसिंह मार्ग लगत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘हुनर हाट’ प्रदर्शनात झिनोबिया सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या झिनोबिया यांच्या पारसी गारा एम्ब्रॉयडरीला भेट देणाऱ्‍यांची  रिघ त्यांच्या प्रयत्नांचे यश अधोरेखित करणारे आहे.
 
 
मुळात गारा एम्ब्रॉडरी ही चीन येथील हस्तकला. झिनोबिया यांनी ही कला शिकण्याकरिता चीनमध्ये संबंधित संस्थांशी संपर्क केला. मात्र चीनी नागरिकांनाच आम्ही ही कला शिकवतो अन्य देशातील लोकांना आम्ही शिकवत नसल्याचा नकारात्मक प्रतिसाद मिळाला. याचवेळी झिनोबिया यांनी ही कला आत्मसात करण्यासाठी एकलव्याप्रमाणे प्रयत्न सुरु ठेवले, त्यासाठी कधी पुस्तक व अन्य लिखीत साहित्य, युट्यूब वरील व्हिडीओ आणि स्वत:ची सृजनशिलता वापरली. आणि पारसी गारा एम्ब्रॉयडरी या हस्तकलेचा ध्यास त्यांनी घेतला येथूनच कामाला सुरुवात झाली.
  

 

 
विशिष्ट मलबारी सिल्क कापडावर कॉर्बीडन शिवण घेऊन विविध वस्तू तयार करण्यात येणारी पारसी गारा एम्ब्रॉयडरी ही हस्तकला. गेल्या 18 वर्षांपासून ही हस्तकला जोपासताना ही कला जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण हुनर हाट या प्रदर्शनात सहभागी झाल्याचे झिनोबिया सांगतात. झिनोबिया यांच्या पारसी ॲम्ब्रॉयडरी स्टॉलवर ठेवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण साड्या, साडी बॉर्डर्स आणि फ्रेम्स हुनर हाटमध्ये येणाऱ्‍या देश विदेशातील कलाप्रेमींना आकर्षित करीत आहेत. येथे बजेट गारा आणि फुल गारा अशा दोन प्रकारच्या साड्या विक्रीस आहेत. रूपये 36 हजार ते 60 हजार किंमतीच्या बजेट गारा साडी व टॉप्स आणि 1 लाख 20 हजार रुपयांची फुल गारासाडीही याठिकाणी आहे. याशिवाय 3 इंच रुंद व 7 मिटर लांबीच्या व 20 हजार रूपये किंमतीच्या सुरेख साडी बॉर्डर तसेच 9 ते 54 हजार रूपये किंमतीच्या वैशिष्टपूर्ण फ्रेमही याठिकाणी आहेत. झिनोबिया यांनी मागील वर्षी मुंबई येथे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाच्यावतीने आयोजित हुनर हाट प्रदर्शनातही सहभाग घेतला होता. येथूनच त्यांनी दिल्ली येथील हुनर हाट प्रदर्शनात सहभागी होऊन देश विदेशातील कला प्रेमींसमोर आपली कला मांडण्याचा निश्चय केला होता असे त्या सांगतात.
  

 

अल्पसंख्याक समाजातील उद्योजकांना मंच उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने हुनर हाट हा उपक्रम राबविण्यात येतो. दिल्लीतील हुनर हाट हे याकडीतील 6 वे आयोजन आहे. राज्यातील हस्तकला व खाद्यपदार्थांचे एकूण 100 स्टॉल्स याठिकाणी उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्यावतीने येथे स्टॉल क्रमांक सी-43 हा पारसी गारा ॲम्ब्रॉयडरीचा स्टॉल उभारण्यात आला असून हा वैशिष्ट्यपूर्ण स्टॉल दिल्लीकर कला रसिकांचे आकर्षण ठरत आहे.
  
झिनोबिया यांनी वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर 1998-2000 या कालावधीत मुंबईतील सोफाया कॉलेज ऑफ फॅशन डिझायनींग मधून डिप्लोमा केला. त्यांना तीन मुले असून त्यांच्या संगोपनासह त्यांनी पारसी गारा एम्ब्रॉयडरीची हस्तकला जोपासली आहे. ही कला देश-विदेशात पोहोचविण्यासाठी शासनाद्वारे आयोजित प्रदर्शनांमध्ये त्यांचा सहभाग निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.
 
- रितेश मोतीरामजी भुयार
उपसंपादक,महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

Best Reader's Review