महिलांच्या सन्मानासाठी आयुष्य वेचणारा खरा ‘पॅडमॅन ऑफ इंडिया’

  • Post By आज दिनांक वेब टीम | Thu 15-02-2018 | 12:30:18 am
  • 5 comments

महिलांच्या सन्मानासाठी आयुष्य

वेचणारा खरा ‘पॅडमॅन ऑफ इंडिया’

ज्या काळामध्ये मासिक पाळी (पिरियड्‌स) बद्दल बोलणे म्हणजे काहीतरी गुन्हा करणे अशी समजूत समाजात होती. त्यावेळी, एक नववी शिकलेला अरुणाचलम

मुरुगनाथनम नावाचा गरीब परिस्थिती असलेला एक व्यक्ती महिलांनी मासिक पाळीमध्ये पॅड (सॅनिटरी नॅपकिन) वापरले पाहिजेत यासाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करायचे ठरवितो. विश्‍वास बसणार नाही असाच प्रवास आहे अरुणाचलम यांचा…

अरुणाचलम यांचा जन्म कोईमतूर येथे 1962 साली झाला. लहान असतानाच वडिलांचे निधन झाले असल्याकारणाने त्यांना आपल्या आईसोबत मजुरी करायला जावे लागत असे. नववी पर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांना त्यांची शाळा सोडावी लागली. पुढे त्यांनी 1998 मध्ये शांती यांच्यासोबत लग्न केले. एकेदिवशी दुपारी ते आपल्या पत्नीसोबत जेवायला बसले असताना त्यांची पत्नी अचानकपणे एक खराब कापड घेऊन घरामध्ये जात असताना त्यांनी पाहिले.

त्यांनी पत्नीला विचारले कि, तू या अशा खराब कापडाचे काय करते…? त्यावर त्यांच्या पत्नीने उत्तर दिले, It is none of your business. याबद्दल पुन्हा पुन्हा विचारले असता त्यांच्या पत्नीने त्यांना मासिक पाळीबद्दल सांगितले. या प्रसंगाच्या अगोदर अरुणाचलम यांना मासिक पाळीबद्दल काहीही माहिती नव्हते. जो कपडा कोणी गाडी पुसण्यासाठीसुद्धा वापरणार नाही असा कपडा आपल्या पत्नीला मासिक पाळीमध्ये वापरावा लागतो, याचे त्यांना खूप वाईट वाटले. पत्नी त्यांना म्हणाली कि, मी जर सॅनिटरी नॅपकिन विकत घेतली तर आपल्याला आपले दुधाचे बजेट कमी करावे लागेल. त्यामुळे मला असले कापड वापरावे लागतात.

येथून सुरू झाला सॅनिटरी पॅड वापरणारा जगातल्या पहिल्या पुरुषाचा थक्क करून सोडणारा प्रवास. वेल्डिंगचे काम करून आपली उपजीविका भागविणारे अरुणाचलम यांना आपली पत्नी आणि अशा असंख्य महिलांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे मनोमन वाटले. त्यांनी यातून स्वच्छ आणि कमी किमतीचे सॅनिटरी नॅपकिन बनविण्याचे ठरविले. यामध्ये खूप मेहनत घेऊन त्यांनी संशोधन चालू केले. बाजारात उपलब्ध असणारे पॅड त्यांनी विकत आणून, त्याचा अभ्यास केला. यातून त्यांना लक्षात आले कि, उत्पादन खर्च काही पैसे असतानाही कितीतरी अधिक पटीने पॅड विकले जात आहेत, जे कि चुकीचे आहे.

अरुणाचलम यांनी स्वत: पॅड तयार करून आपल्या पत्नीला वापरण्यास दिले. पॅडच्या दर्जाबाबत पत्नीला विचारले असता त्यांनी सांगितले कि, तुम्ही बनवलेले पॅड निकृष्ट दर्जाचे आहेत. पुन्हा त्यांनी सुधारणा करून पॅड बनविले. त्यांना पॅडचा प्रयोग करण्यासाठी अधिक महिलांची गरज होती. कारण, पत्नीवर प्रयोग करण्यासाठी त्यांना एक महिना थांबावे लागत असे. त्यामुळे त्यांनी मग वैद्यकीय महाविद्यालयीन तरुणींकडे ते पॅड दिले.

परंतु, वैद्यकीय महाविद्यालयीन विद्यार्थीसुद्धा या विषयी खुलेपणाने चर्चा करीत नसल्याचे त्यांना जाणवले. ज्या ज्या महिलांना त्यांनी पॅड वापरायला दिले त्यांच्याकडून अरुणाचलम यांना योग्य उत्तरे मिळाली नाहीत. स्वत: पॅड घालून; ते सायकलवरून प्रवास करू लागले. पॅड बनविण्यासाठी कॉटन वापरूनही अपेक्षित निकाल येत नव्हता. त्यांनी एक वेगळा प्रयोग करायचे ठरविले. मासिक पाळीमध्ये महिलांनी वापरलेले पॅड त्यांनी गोळा करायला सुरूवात केली. त्यावर त्यांनी संशोधन केले. त्यातून त्यांना भरपूर शिकायला मिळाले.

अरुणाचलम यांनी दर्जात्मक आणि कमी किमतीचे पॅड बनविण्यासाठी आपल्या जीवनातील बरीच वर्ष मेहनत घेतली. यातून ते यशस्वी झाले. आयआयटी मद्रास येथील “Best Innovation for the betterment of society’ या स्पर्धेत त्यांनी स्वत: तयार केलेले पॅड बनविण्याचे “मशीन’ पाठविले. या स्पर्धेत 943 स्पर्धकांपैकी त्यांचा पहिला क्रमांक आला. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सॅनिटरी नॅपकिन मध्ये असलेले वर्चस्व कमी करीत आज अरुणाचलम यांनी देशातील 27 राज्यांसह 7 देशांमध्ये आपले तंत्रज्ञान वापरण्यास दिलेले आहे. यातून ग्रामीण महिलांना खूप मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेला आहे.

या खडतर प्रवासामध्ये अरुणाचलम यांना त्यांच्या पत्नीने, आईने आणि बहिणीने सोडून दिले. घरच्या लोकांची अशी धारणा झाली होती कि, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. यातून बायकोने घटस्फोट नोटीसही पाठविली होती. लोकांचे बोलणे, अपमान सहन करीत आज अरुणाचलम सर्व जगाचे आदर्श बनले आहेत. 2014 मध्ये टाइम्स या जगप्रसिद्ध मासिकाने जगातील सर्वाधिक प्रभावशाली 100 व्यक्तींच्या यादीमध्ये त्यांची नोंद केली होती. भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे.

भारतातील 10% पेक्षा कमी महिला सॅनिटरी नॅपकिन वापरतात. देशातील सर्व महिलांनी सॅनिटरी नॅपकिन वापरले पाहिजेत आणि मी माझ्याकडून देशातील ग्रामीण भागातील 10 लाख महिलांना रोजगार उपलब्ध करून देईन असे स्वप्न घेऊन अरुणाचलम यांचा प्रवास चालू आहे. अरुणाचलम यांच्यावर असंख्य माहितीपट निघाले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला पॅडमॅन हा चित्रपट त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

 

Best Reader's Review