माधवाशी मानवाचं जोडलं नातं!

  • Post By आज दिनांक वेब टीम | Wed 12-07-2017 | 02:36:26 pm
  • 5 comments

फाईल फोटो

माधवाशी मानवाचं जोडलं नातं!

परम पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) प्रेरित स्वाध्याय परिवारातर्फे १२ जुलै रोजी दरवर्षी माधववृंददिन, वृक्षमंदिरदिन, युवादिन असे सर्व उत्सव एकत्रितरित्या साजरे करण्यात येतात. वृक्षात भगवंत स्वरूप बघून स्वाध्याय परिवार दरवर्षी लाखो वृक्षांचं पूजन (संगोपन) करतो. पूज्य पांडुरंगशास्त्री यांची सुपुत्री धनश्री (दीदी) तळवलकर यांचा जन्मदिन १२ जुलै (१९५७) असून युवादिन म्हणून साजरा होतो. यावर्षीमाधववृंददिनाला २५ वर्षे झाली असून दीदींचे हे षष्ठयब्दीपूर्ती वर्ष आहे.

---------------------------------------------

भगवंताला केंद्रस्थानी ठेवून पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी मानवी कल्याणाचा स्वाध्याय यज्ञ सुरू केला. दैवी विचारांच्या बळावर माणूस क्रांतीकारी कार्य करू शकतो हे त्यांनी विविध प्रयोगातून सिद्ध केलं. दादांचे विचार आणि कार्य स्वाध्यायींसाठी सदैव प्रेरक आहे. धनश्रीदीदी या कार्याला अधिक तीव्रतेने पुढे घेवून जात आहेत. स्वाध्याय कार्य आज जगातील वीसहून अधिक देशात प्रभावीपणे सुरू आहे. यामुळचं दादांचा आशिर्वाद आणि दीदींच्या मार्गदर्शनात स्वाध्याय परिवार विश्वविजयी वाटचाल करत आहे. 

 

मानव्यासाठीस्वाध्यायराजमार्ग

वैश्विक कल्याणासाठी माणसाचा आत्मिक विकास आवश्यक आहे. यासाठी पूजनीय दादांनी ‘स्वाध्याय’ हा राजमार्ग सांगितला. व्यक्ती जीवन उन्नत, तेजस्वी बनावे यासाठी मुंबईस्थित श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेतून वेद आणि उपनिषदांचे विचार आधुनिकतेच्या संदर्भाने मांडले. या विचारांना तत्त्वज्ञान विद्यापिठाच्या माध्यमातून कृतीत उतरवलं. दादांनी ‘भक्ती ही सामाजिक शक्ती’ असल्याचं सांगितलं अन् सिद्ध देखील केले. भक्तीतून समाजाकडं, निसर्गाकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. प्रेम आणि सद्विचारांनी पूजनीय दादांनी सकारात्मक परिवर्तन आणले. चारित्र्य संपन्न आणि शीलवान नागरिक हे राष्ट्राचे सर्वात मोठे भूषण असते. गुणवाण, शीलवान आणि चारित्र्यवान व्यक्ती जीवनं स्वाध्यायातून घडतं आहेत. यासाठी दादांनी बालकांपासून वयस्थांपर्यंत सर्वांना जीवनलक्षी शिक्षण दिलं आहे. बालसंस्कार, युवा, युवती, महिला, स्वाध्याय, मानार्ह या विविध केंद्रातून मानव्याला मानवतेचं शिक्षण मिळत आहे. दादांनी माणसावर प्रयोग करत निसर्गाशी त्याचं नातं जोडलं. यातूनच निर्मल नीर, माधववृंद, वृक्षमंदिर यासारख्या प्रयोगांचं दर्शन घडलं. निसर्गाचं पूज्य भावानं संगोपन करण्याची प्रेरणा दादांनी दिली.

वृक्षात वासुदेवाचं दर्शन

पूजनीय दादांनी वृक्षात वासुदेव अर्थात भगवंतला बघण्याची समज दिली. वृक्ष आणि वनस्पतींकडे केवळ सौंदर्य आणि उपयोगितेच्या दृष्टीकोन न ठेवता भक्तीच्या डोळ्यानं बघण्याचा दृष्टीकोन त्यांनी दिला. यामागचं बुद्धिप्रामाण्य समजावताना ते म्हणत की, “गुरूत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे वरून सोडलेली कोणतीही वस्तु जमिनीवर येते. वृक्ष ज्यावेळी पाणी घेतात तेव्हा गुरूत्वाकर्षाच्या विरूद्ध कार्य घडतं. विज्ञान याला केशाकर्षण म्हणते पण, हे केशवाकर्षण (कृष्ण) आहे. मुळातून पाणी पानांपर्यंत घेऊन जाणारी ही शक्ती म्हणजेच ईश्वरी शक्ती होय.” १२ जुलैच्या दिवशी स्वाध्यायी कुटुंब आपल्या घरासमोर किंवा शेतात वृक्ष लावतात. मुर्तिपुजा करताना जसा जलाभिषेक केला जातो, त्याच पद्धतीने या वृक्षाला मंत्रोच्चारांनी नियमित पाणी घातलं जातं. लहान बाळाप्रमाणं त्याच संगोपन केलं जातं. माधव हे श्रीकृष्णाचं नाव असून वृक्षाच्या रूपात त्याला कुटुंबातील सदस्य मानलं जातं. दरवर्षी वृक्ष लावल्यानं त्यांचा बनलेल्या समुदायाला ‘वृंद’ संबोधलं जातं. वर्ष १९९२ पासून दरवर्षी हा ‘माधववृंद’ दिन साजरा होतो. यावर्षी माधववृंद दिनाला पंचवीस वर्षे झाली आहेत. या पंचवीस वर्षांच्या दरम्यान आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वृक्षांचं संगोपन झाल्यानं कोट्यावधी वृक्षाचं संवर्धन झालं आहे. मानवाच्या हव्यासापोटी बोडख्या होणार्‍या या सृष्टीला अलंकारित करण्याचा हा प्रयत्न आहे. वृक्षसंधर्वन कार्यासाठी वर्ष १९८७ मध्ये केंद्र शासनातर्फे ‘इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार’ देऊन दादांना आणि स्वाध्याय परिवाराला सन्मानित करण्यात आलं.

 

वृक्षमंदिरभव्य संकल्पना

वृक्ष, वेली यांनाही मन आणि भावना असतात असे, जगदीशचंद्र बोस या शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवलं होतं. पूजनीय दादांनी यापुढं जावून वृक्षातील भगवंत विभुतीचं दर्शन आज घडवलं आहे. मंदिर म्हटलं की, एखादी भव्यदिव्य कलात्मक वास्तु, त्यातील मुर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. स्वाध्यायी परिवाराचं वृक्षांचं मंदिर मात्र, जगावेगळं आहे. दादांनी केलेल्या विविध प्रयोगांमधील ‘वृक्षमंदिर’ हा एक प्रयोग आहे. विस्तीर्ण क्षेत्रावर वृक्ष लागवड करून मंदिराप्रमाणे या क्षेत्राचं पावित्र्य जपलं जातं. मुर्तिप्रमाणे वृक्षांची याठिकाणी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाते. या वृक्षांचं भक्तीच्या दृष्टीकोनातून संगोपनं केलं जातं. या प्रयोगाच्या आसपासच्या वीस गावातील स्वाध्यायी निश्चित केलेल्या तारखेला पुजारी म्हणूनं वृक्षमंदिरात येतातं. निसर्गातीलं भगवद् स्पर्शाची अनुभूती स्वाध्यायी येथे करतात. देवावर आणि त्याने निर्माण केलेल्या या चराचर सृष्टीवर निस्वार्थ प्रेम करण्याचं हे ठिकाण म्हणावं लागेलं. या पद्धतीची देशभरात २७ वृक्षमंदिरे आहेत. महाराष्टातील देवभाने (ता.जि. धुळे) आणि जाटपाडे (ता. मालेगाव जि. नाशिक) येथील वृक्षमंदिरात खडकाळ जमिनीत वृक्ष फुलविण्याची किमया स्वाध्यायींनी केली आहे. दीदी म्हणतात की, “ईश्वराचं सर्वव्यापकत्व अनुभवण्यासाठी हा प्रयोग आहे.” 

 

युवकांचा जीवन विकास

पूजनीय दादांनी तरुणावर विश्वास ठेवला आणि या सांस्कृतिक कार्यात त्याला जोडलं. आधुनिकतेच्या संदर्भानं तत्त्वज्ञानाचं बाळकडू देत त्याला कृतीप्रवण बनवलं. आज देशविदेशात २५ हजारांहून अधिक युवाकेंद्रे सुरू आहेत. यात लाखोंच्या संख्येने युवक आणि युवतीं सहभागी आहेत. आज या तरुणाईला दीदींनी एका सूत्रात बांधलं आहे. विशेष म्हणजे जगाच्या पाठीवर विविध ठिकाणी असणार्या प्रत्येक युवाकेंद्रात एकसारखी कृती घडते. गीतेच्या विचाराचं लोकशिक्षण घडावं म्हणून दीदींनी मांडलेल्या गीता जयंती वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांच्या संकल्पनेला स्वाध्यायी तरुणांनी डोक्यावर घेतलं. गीताजयंती उत्सवाच्या निमित्ताने श्रीमद्भगवद्गीतेचे विचार जवळपास २० ते २५ लाख युवकांपर्यंत घेऊन जाण्याचं कार्य स्वाध्यायी कृतिशील करतात. जन्माष्टमीच्या निमित्ताने स्वाध्यायी तरुण दरवर्षी पथनाट्य करतात. यातून लोकांमध्ये डोळस श्रद्धा आणि वैचारिक समज देण्याचा प्रयत्न होत आहे. जीवन विकासात्मक विषय आणि खेळांचा माध्यमातून युवकांचे मानसिक, बौद्धिक आणि शारिरीक सामर्थ्य वाढत आहे. या युवाकेंद्रातून जीवन विकासाचे धडे मिळत आहे. यामुळचं आज स्वाध्यायी युवाशक्तीतून विधायक कार्य घडतं आहे. दीदी या लाखो युवकांच्या प्रतिनिधी आहेत. दीदींचा जन्मदिन ‘युवादिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

 

वैश्विक स्तरावर सन्मान

पूजनीय धनश्रीदीदी यांनी ‘सम्यक् तनोति इति सन्तान’ या ध्येयानं दादांनी आरंभिलेल्या स्वाध्याय कार्यात स्वतःला वाहून घेतलं. स्वाध्यायी कृतिशीलांसोबत दैवी कार्याची धुरा त्या समर्थपणे सांभाळत आहेत. स्वाध्याय कार्याला अधिक गतिने पुढे घेऊन जाण्याचं कार्य त्यांनी केलं. देशभरात साकारित झालेले १० हजार ‘योगेश्वर कृषी’ प्रयोग हे दीदींच्या नेतृत्वाचं द्योतक आहे. गीतेचे विचार ४० लाख क्षत्रियांपर्यंत पोहचवून त्यांनी ‘क्षत्रिय संचलन’चा उत्सव केला. पूजनीय दादांच्या ९० व्या जन्मदिनाच्या निमित्ताने वर्ष २०१० मध्ये आदरणीय दीदींच्या संकल्पनेतून ‘नमस्तुभ्यम्’ कार्यक्रमात लाखोंचा परिवार सहभागी झाला. यावेळी या दैवी स्वाध्याय कार्याचं विश्वरूप दर्शन अनेकांनी ‘याचि देही, याचि डोळा’ अनुभवलं. वैश्विक स्तरावरील अनेक सभांमध्ये दीदींना मार्गदर्शक म्हणून खास आमंत्रित करण्यात आलं आहे. सप्टेंबर १९९३ मध्ये स्वामी विवेकानंद यांच्या वैचारिक शताब्दी वर्षांच्या निमित्ताने अमेरिकेतील शिकागो शहरात आयोजित धर्म परिषदेसाठी त्या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. रोममध्ये आयोजित विश्वशांती धर्म सभेसाठी पोप जॉन पॉल यांनी त्यांना खास आमंत्रित केलं होतं. इटलीमेधील ‘फोकलारे’ या लोकचवळीत दीदींना मानाचं स्थानं आहे. खडतर तप आणि अविश्रांत कर्मयोगाचं दर्शन दीदींमधून घडतं, त्यांच्या षष्ठाब्दीपूर्ती निमित्ताने त्यांना वंदन!

- राहुल कुलकर्णी, गंगापूर

Best Reader's Review